![]()
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि वाहनचोरीच्या गुन्ह्यांतील दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत १२ गुन्हे उघडकीस आल्याचा पोलिसांचा दावा आहे. पोलिसांनी सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने, दोन मोटारसायकली आणि मोबाइलसह १५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्यातील दरोडा, घरफोडी आणि चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी तसेच दाखल गुन्हे उघड करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करत होते. इंदापूर परिसरात गस्त घालत असताना काही संशयित इंदापूरला येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुणे-सोलापूर बायपास रस्त्यावरील जगदंब हॉटेलजवळ सापळा रचला. मोटारसायकलवरून आलेल्या संशयितांनी पोलिसांना पाहताच पळण्याचा प्रयत्न केला. पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यात मोबाईल उर्फ हरी पवार आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशीत संबंधित मोटारसायकली चोरीच्या असल्याचे समोर आले. या वाहनांबाबत पंढरपूर आणि करकंब पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. दौंड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खडकी येथील घरफोडीत चोरीला गेलेला मोबाइलही मिळाला. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात दाखल जबरी चोरीचा गुन्हाही पथकाने उघड केला. या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. चौकशीत एक दरोडा, एक जबरी चोरी, आठ घरफोड्या आणि दोन मोटारसायकल चोरी अशा १२ गुन्ह्यांची कबुली मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलिस ठाण्यांच्या पथकांनी ही कारवाई केली. पुढील तपास दौंड पोलिस ठाणे करत आहे.
Source link
पुणे ग्रामीण पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली:12 गुन्हे उघड; 15 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त