![]()
मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयात प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक डास दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. डासांमुळे होणारे आजार, त्यांचा प्रसार, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच परिसर स्वच्छतेचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ.आर.टी. चौधरी यांनी जागतिक डास दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. डासांची उत्पत्ती, जीवनचक्र तसेच डास जन्य आजारांचा प्रसार याबाबत माहिती देत रोगप्रतिबंधासाठी जनजागृती आणि सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. डॉ.एस.डी. चाटे यांनी मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुन्या आणि हत्तीरोग यांसारख्या डासांमार्फत पसरणाऱ्या आजारांची माहिती दिली. रोगजंतूंचा प्रसार कसा होतो आणि त्यापासून बचाव करण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, यावर मार्गदर्शन केले. यावेळी बी.एस्सी. प्राणिशास्त्र विभागातील यश रवाये, जया गुरचल आणि सानिया तडवी या विद्यार्थ्यांनी जागतिक डास दिन, डास जन्य आजार आणि त्यांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर आपले विचार व्यक्त केले. डासांची उत्पत्ती रोखून परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमासाठी प्राणिशास्त्र विभागाचे प्रयोगशाळा परिचर अशोक पाटील यांनी परिश्रम घेतले. डासांची उत्पत्ती रोखा, डास जन्य आजारांना आळा घाला आणि निरोगी समाज घडवा हा जनजागृतीपर संदेश यावेळी दिला.
Source link
जागतिक डास दिन:खडसे महाविद्यालयातून घडवली जनजागृती, आजार, उपाययाेजना, परिसर स्वच्छतेचे महत्त्व बिंबवले