Headlines

जागतिक फिजिओथेरपी दिन विशेष:‘फिजिओथेरपीने नवे आयुष्य दिले, पुन्हा माझ्याच पायांवर उभे केले’; शस्त्रक्रिया टळली, वेदना संपल्या; एका वर्षात 14,146 रुग्णांना नवसंजीवनी




औषधोपचार आणि शस्त्रक्रियेसोबतच रुग्णांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पुन्हा उभे करण्याचे महत्त्वाचे कार्य फिजिओथेरपी (भौतिकोपचार) करते. जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त ‘दिव्य मराठी’ने या उपचार पद्धतीमुळे जीवन पूर्णपणे बदललेल्या व्यक्तींचे अनुभव जाणून घेतले. आयुष्य नव्याने जगण्याची उमेद देणाऱ्या या शाखेत होणाऱ्या नव्या संशोधनांमुळे मानवी जीवन अधिक सुसह्य होत आहे. शहरातील एमजीएम फिजिओथेरपी रुग्णालयात वर्षभरात तब्बल १४,१४६ रुग्णांनी उपचार घेतले आहेत. हृदयविकार, मेंदूचे विकार, हाडांची दुखणी आणि अपघातातील रुग्णांसाठी फिजिओथेरपी खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहे. शांतपणे चमत्कार घडवणारी उपचार पद्धती “आतापर्यंत आम्ही अनेक रुग्णांमध्ये बदल होताना पाहिले आहेत. शस्त्रक्रियेनंतर किंवा अपघातानंतर रुग्णांचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते, अनेकदा ते आत्मविश्वास गमावतात. अशा वेळी फिजिओथेरपी अत्यंत शांतपणे चमत्कार घडवून त्यांना पुन्हा उभे करते.” – डॉ. वैभवी वाळिंबे, फिजिओथेरपी तज्ज्ञ असह्य वेदनांवर फिजिओथेरपी निश्चित उपाय “दरमहा १,६०० ते १,८०० रुग्ण उपचार घेतात. मणक्यांचे आजार, गुडघ्यांचे दुखणे आणि रुग्णांच्या असह्य वेदना फिजिओथेरपीमुळे बऱ्या होतात.” – डॉ. वैशाली पाटील-मसलेकर, फिजिओथेरपी विभागप्रमुख, ईएसआयसी २५ दिवसांच्या उपचाराने मिळाला चालण्याचा आत्मविश्वास “मी २१ वर्षांची सॉफ्टवेअर इंजिनिअर असून सध्या मुंबईत नोकरी करते. जन्मजात माझा एक पाय ३ इंच कमी आहे. म्हणून मी कृत्रिम पायाचा आधार घेतला. मात्र मला आत्मविश्वासाने चालता येत नव्हते. मी २५ दिवस फिजिओथेरपी घेतली आणि आयुष्यात पहिल्यांदाच “पोश्चर करेक्शन’ ही संकल्पना मला समजली. थेरपिस्टने पोश्चर दुरुस्त करताच मला चालण्याचा आत्मविश्वास मिळाला. स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने चालता येण्याचा आनंद काय असतो हे मीच सांगू शकते.” – रेवा (नाव बदललेले आहे) मला गुडघ्यांचा प्रचंड त्रास होता, थेरपीमुळे टळली शस्त्रक्रिया “मला गुडघ्यांचा प्रचंड त्रास होऊ लागला होता. वयानुसार होणारा त्रास म्हणून काही दिवस सहन केले; पण वेदना असह्य झाल्यावर शहरातील व पुण्यातील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञांना दाखवले. सर्वांनी गुडघा प्रत्यारोपण हाच पर्याय सुचवला. मला शस्त्रक्रिया नको होती म्हणून मी १ महिना फिजिओथेरपी घेतली. इथेच खऱ्या अर्थाने चमत्कार झाला आणि मला वेदनेतून कायमची मुक्ती मिळाली. फिजिओथेरपी वेदनेतून कशी मुक्ती देते याची मला प्रचिती आली.” – कल्पना पडूळ, (६०)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *