Headlines

Rohit Pawar Slams Gunratna Sadavarte Over Maratha Reservation


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून आमदार रोहित पवार यांनी अ‍ॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सदावर्

.

रोहित पवार मंगळवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, मनोज जरांगे यांचे आंदोलन, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील कथित गैरप्रकार, कृषी विभागातील पदकपात, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन तसेच सरकारच्या विविध धोरणांवर भाष्य केले.

सदावर्ते हे फडणवीसांचे राजकीय शूटर

मनोज जरांगे हे शरद पवार यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता. त्यावर रोहित पवार यांनी सदावर्ते यांना लक्ष्य केले. “गुणरत्न सदावर्ते हे मुख्यमंत्र्यांचे माणूस आहेत. ते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी बोलतात,” असा दावा त्यांनी केला. “देवेंद्र फडणवीस यांच्या आजूबाजूला असे अनेक शुटर आहेत. हे शुटर म्हणजे बंदूक चालवणारे नव्हेत, तर राजकीय पद्धतीने बोलणारे लोक आहेत. मोठ्या नेत्याने स्वतः बोलण्यापेक्षा अशा लोकांकडून वेगवेगळी वक्तव्ये करून घेतली जातात आणि त्यातून बातम्या निर्माण होतात,” असा आरोप रोहित पवार यांनी केला.

सदावर्ते यांच्या पेहरावावरही त्यांनी टिप्पणी केली. “ते नवीन-नवीन कपडे घालतात, वेगवेगळ्या रंगांचे गॉगल वापरतात. आपण गाईचे किंवा म्हशीचे दूध पितो. ते गाढविणीचे दूध पितात. ते दूध प्यायल्यानंतर डोक्यावर काय परिणाम होतो, हे त्यांच्याकडे पाहिल्यावर कळते,” असे रोहित पवार म्हणाले.

मराठा आरक्षणावर घटनादुरुस्ती हाच मार्ग

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत रोहित पवार यांनी सरकार आणि जरांगे यांच्यात चर्चा सुरू असल्याचे सांगितले. “मराठा आरक्षणाचे आंदोलन हे सामाजिक आंदोलन आहे. मनोज जरांगे हे स्वतः सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. मुख्यमंत्री आणि सरकारची त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. दोन्ही बाजूंमध्ये चर्चा सुरू असताना आम्ही त्यापलीकडे जाऊन बोलून काय होणार?” असा सवाल त्यांनी केला. मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर केंद्राच्या पातळीवर प्रयत्न करण्याची गरज असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

“मराठा असो किंवा धनगर समाजाचे आरक्षण असो, आरक्षणाचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचे असतील तर संसदेत घटनादुरुस्ती करावी लागेल. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी एकत्र बसून हा मुद्दा दिल्लीमध्ये मांडला, पंतप्रधानांसमोर भूमिका मांडली तर न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळवण्याचा मार्ग निर्माण होऊ शकतो,” असे ते म्हणाले.

सोमेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन

बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरही रोहित पवार यांनी भाष्य केले. अजित पवार यांच्या निधनाला अद्याप एक वर्षही पूर्ण झालेले नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर कारखाना चांगल्या पद्धतीने चालत होता, असे सांगत ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व पक्षांच्या प्रमुखांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. “अजितदादांचा या कारखान्यावर प्रेम होतं. आमच्याकडील काही चांगले संचालक आणि अजितदादांच्या पक्षातील काही चांगले संचालक एकत्र घेऊन शेतकऱ्यांना स्वीकार्य असलेली टीम तयार करता आली आणि निवडणूक बिनविरोध झाली तर चांगले होईल,” असे ते म्हणाले. मात्र, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही नेते सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घालत असल्याची माहिती आपल्याला मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. “सर्वांनी एकत्र बसून अजितदादांकडे पाहून ही निवडणूक बिनविरोध केली तर ती अजितदादांना श्रद्धांजली ठरेल,” असे रोहित पवार म्हणाले.

मित्रपक्षासोबतच जमत नाही, मग आमच्यावर टीका कशाला?

यावेळी रोहित पवार यांनी महायुतीतील अंतर्गत राजकारणावरही निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ खाते मिळावे यासाठी मुख्यमंत्री आणि केंद्रीय नेतृत्वासोबत बैठका झाल्याचा दावा करत त्यांनी अद्यापही हे खाते भाजपकडे असल्याचे म्हटले. “त्यांच्या मित्रपक्षासोबतच त्यांचे जमत नाही. अशा परिस्थितीत लोकांची भूमिका सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असेल तर आम्ही लोकांसोबत राहून सरकारच्या विरोधात बोलत राहू. त्यांनी आधी आपल्याकडे काय चालले आहे ते पाहावे,” अशी टीका त्यांनी केली.

MPSC प्रकरणावर रोहित पवार आक्रमक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये निर्माण झालेल्या वादावरही रोहित पवार यांनी सरकारला लक्ष्य केले. आयोगाच्या अध्यक्षांपासून संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. “एमपीएससीमध्ये जे घडले ते आता उघड झाले आहे. आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिलाच पाहिजे. इतर संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. चौकशी समित्या आणि विशेष तपास पथकांची घोषणा करून प्रश्न सुटत नाहीत, असा दावा करत त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “अनेक एसआयटी झाल्या, पण त्यातून ठोस निर्णय होताना दिसत नाही. केवळ लोकांना दाखवण्यासाठी समित्या स्थापन करण्यापेक्षा प्रत्यक्षात दोषींवर कारवाई झाली पाहिजे,” असे ते म्हणाले.

MPSC अध्यक्षांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. सुरुवातीला गैरप्रकार झालाच नसल्याचे सांगायचे आणि नंतर काही बाबी समोर आल्यानंतर भूमिका बदलायची, असा आरोप त्यांनी केला. आयोगामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याची गरज असून स्वच्छ प्रतिमा आणि पारदर्शक कामकाज असलेला अध्यक्ष नेमावा, अशी मागणी त्यांनी केली.

PSI परीक्षेत ‘मास कॉपी’चा दावा

PSI परीक्षेबाबतही रोहित पवार यांनी गंभीर आरोप केला. सुमारे 150 उमेदवारांनी सामूहिक कॉपी करून परीक्षा उत्तीर्ण केल्याचा आरोप त्यांनी केला असून, यासंदर्भातील पुरावे आपल्याकडे आल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणातील पुरावे लवकरच सार्वजनिक करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे MPSC परीक्षांबाबत सुरू असलेल्या वादाला आणखी राजकीय धार मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, MPSC पेपरफुटी प्रकरणात सात आरोपींना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून डिजिटल पुराव्यांचीही छाननी केली जात आहे.

ऑनलाइन परीक्षेच्या व्यवस्थेवर सरकारने लक्ष द्यावे

ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी खासगी कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या कंत्राटांबाबतही रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले. काही कंपन्यांना विविध विभागांमध्ये सातत्याने कामे मिळत असल्याचा दावा करत त्यांनी या कंत्राट प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. विशिष्ट कंपन्यांशी संबंधित व्यवहार, कंत्राटे आणि त्यांना कामे देण्याची प्रक्रिया यांची माहिती सरकारकडून अधिकृतपणे मागितल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित कंत्राटे, सेवा आणि उपकरण खरेदी याबाबत आपल्याकडे काही पुरावे असल्याचाही दावा त्यांनी केला.

कृषी विभागातील 5,000 पदे रद्द केल्यावर सवाल

कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली. कृषी क्षेत्रातील निर्णय घेण्यासाठी स्थापन केलेल्या समित्यांमध्ये प्रत्यक्ष कृषी क्षेत्राशी संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि शेतकऱ्यांना पुरेसे प्रतिनिधित्व दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. “कृषी विभागातील 5,000 पदे काढून टाकली तर शेतकऱ्यांना सेवा कोण देणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन निर्णय घेण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्रातील लोकांना प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची मागणी त्यांनी केली.

गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या

ध्वनिप्रदूषणाच्या नियमांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करावा लागेल, असे सांगतानाच गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवात पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका रोहित पवार यांनी मांडली. ढोल, लेझीम आणि इतर पारंपरिक वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांना अधिक संधी दिल्यास महाराष्ट्राची परंपरा जपण्यासोबतच हजारो कलाकारांना रोजगार मिळू शकतो, असे ते म्हणाले. नियमांचे उल्लंघन करणारा कोणताही पक्ष किंवा व्यक्ती असो, त्याच्यावर समान कारवाई झाली पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधकांसाठी वेगवेगळे निकष असू नयेत, अशी मागणीही त्यांनी केली.

माझी सुरक्षा खासगी; सरकारी यंत्रणेवर भार टाकत नाही

आपल्या सुरक्षेबाबतही रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. वाढीव पोलिस सुरक्षा घेत नसून आपली सुरक्षा खासगी असल्याचे त्यांनी सांगितले. “महाराष्ट्राच्या तिजोरीतील सामान्य लोकांचा पैसा माझ्या सुरक्षेवर खर्च होऊ नये, अशी माझी भूमिका आहे. त्यामुळे माझी सुरक्षा खासगी आहे. पोलिसांचा वापर लोकांना सेवा देण्यासाठी व्हावा,” असे ते म्हणाले.

राष्ट्रपतींच्या कार्यक्रमावरून केंद्रावर निशाणा

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातमध्ये आयोजित करण्याच्या निर्णयावरही रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले. राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख असल्याने अशा कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलचा सन्मान राखला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण आणि नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा संदर्भ देत राष्ट्रपतींना योग्य स्थान दिले गेले नसल्याची टीका त्यांनी केली. राष्ट्रीय कार्यक्रम गुजरातमध्ये नेण्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सत्ताधाऱ्यांना इशारा

MPSCच्या प्रश्नावर पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी काढलेल्या आक्रोश मोर्चात रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम सहभागी झाले होते. या आंदोलनावर सत्ताधारी नेत्यांकडून टीका करण्यात आली. प्रवीण दरेकर यांनी आंदोलनाला राजकीय नौटंकी म्हटले, तर चित्रा वाघ यांनीही रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या सहभागावर टीका केली. यावर रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ‘नौटंकी’ म्हणू नका, अन्यथा ते महागात पडेल, असा इशारा दिला. सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने चर्चा करावी आणि MPSCमध्ये निष्पक्ष व्यक्तीची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा…

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 11वा दिवस:मध्यरात्री प्रकृती खालावली, अडीच वाजता मंत्र्यांचा फोन; मराठा आंदोलक आक्रमक

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 11वा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यानंतर मागण्यांबाबत आश्वासन मिळाले होते. मात्र, त्यानंतर ठोस कार्यवाही होत नसल्याने जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी पाणी आणि उपचार घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे आंदोलनस्थळी उपस्थित मराठा समाजबांधवांमध्ये त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.