![]()
देशभरात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची चळवळ राबवली जात आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून संपूर्ण शहर पर्यावरणपूरक बनवण्याच्या संकल्पाने मनपा आणि ‘दिव्य मराठी’च्या संयुक्त विद्यमाने शहरातील सर्वात मोठ्या मातीच्या गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (११ सप्टेंंबर) सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत श्रीहरी पॅव्हेलियन, शहानूरमियाँ दर्ग्याजवळ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आपल्या लाडक्या बाप्पांची मूर्ती स्वतःच्या हातांनी साकारणार आहेत. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना या मोफत उपक्रमात सहभागी होता येईल. पर्यटन राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरातील नागरिक पर्यावरणप्रेमी आहेत. त्यांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी ‘दिव्य मराठी’ आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात येत आहे. पर्यावरण संरक्षणासाठी मातीच्या मूर्ती महत्त्वाच्या नदी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करणे अत्यंत गरजेचे आहे. या भव्य कार्यशाळेत संपूर्ण शहरातील नागरिक एकत्र येऊन नवा आदर्श निर्माण करतील अन् राज्यात आपल्या शहराची वेगळी प्रतिमा निर्माण होईल. -अमोल येडगे, आयुक्त, महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर सहभागी कुटुंबांना लाभणार १०० हून अधिक निष्णात प्रशिक्षकांचे मार्गदर्शन शहरातील नामांकित मूर्तिकार, कला महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि १०० हून अधिक निष्णात प्रशिक्षकांचे पथक तुम्हाला काळ्या मातीपासून सुंदर मूर्ती कशी घडवायची, याचे सोपे मार्गदर्शन करतील. मनपा पर्यावरण विभागाचे उपायुक्त नंदकिशोर भोंबे हे उपक्रम प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. या उपक्रमात सहभागी झालेल्यांना पारितोषीक देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक उत्सवाची महासंकल्पना शहराला पूर्णपणे पर्यावरणपूरक बनवण्यासाठी शहराने पुढाकार घेतला आहे. नागरिकांनी आणि गणेश मंडळांनी मोठ्या संख्येने या कार्यशाळेत एकत्र येऊन स्वतःच्या हातांनी बाप्पाची मूर्ती घडवण्याचा आनंद घ्यावा. -समीर राजूरकर, महापौर पूर्वनोंदणी आवश्यक : कार्यशाळा पूर्णपणे मोफत असली तरी नियोजनासाठी पूर्वनोंदणी अनिवार्य आहे. सोबत दिलेल्या क्यूआर कोडवर स्कॅन करून किंवा नोंदणी लिंकवर जाऊन आपल्या कुटुंबाचा प्रवेश आजच निश्चित करावा. या गणेशोत्सवात संपूर्ण कुटुंबासह एकत्र येत बाप्पाची मूर्ती घडवण्याचा अनमोल आनंद लुटता येणार आहे. १ लाखाची आकर्षक बक्षिसे कार्यशाळेत घडवल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट मूर्तींसाठी तब्बल १ लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक व ११ विशेष उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय स्थानिक कलाकार आणि गणेश मंडळांसाठी विशेष पुरस्कार देण्यात येणार असून प्रत्येक ग्रुपला स्वतंत्र प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मूर्ती साकारण्यासाठी लागणारी माती व सर्व साहित्य आयोजकांकडून देण्यात येणार आहे. तेव्हा मोठ्या संख्येने या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Source link
पर्यावरण रक्षणाचा वसा जपूया, कुटुंबासोबत एकत्र येत मातीचा बाप्पा घडवूया:‘दिव्य मराठी’ व मनपाकडून उपक्रम, 1 लाखाची बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी