![]()
किरकोळ वादातून मारहाण केल्याने तक्रार देण्यासाठी पहूर पोलिस ठाण्याकडे निघालेल्या कुंभारी येथील पिता-पुत्राच्या दुचाकीचा शेजाऱ्याने कारने पाठलाग करून पाठीमागून जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. या घटनेत ज्ञानेश्वर उत्तम मोरे (४९) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा यश मोरे हा गंभीर जखमी झाला. घटनेनंतर पहूर पोलिस ठाण्यासमोर नातेवाईक व समाजबांधवांनी आंदोलन करत आरोपींच्या अटकेची मागणी केली. दरम्यान, कुंभारीत पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला, तर पहूर येथे विभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. घरासमोरील रस्त्यावर ठेवलेल्या बाकांवर काही टवाळखोर मुले बसून त्रास देत असल्याने हे बाक काढून टाकावेत, अशी मागणी ज्ञानेश्वर मोरे यांनी ग्रामपंचायतीकडे केली होती. मात्र, बाक काढण्यास शेजारी राहणाऱ्या जोशी बंधूंनी विरोध केला. यावरून मोरे व जोशी यांच्यात वाद झाला. ज्ञानेश्वर मोरे यांना मारहाण केल्याने त्यांनी थेट पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय घेतला. यासाठी ते मुलाला सोबत घेवून गावातून दुचाकीने निघाले होते. आपल्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी पिता-पुत्र निघाल्याची माहिती मिळाल्यानंतर बाळू उत्तम जोशी, शांताराम उत्तम जोशी व अजय त्र्यंबक जोशी यांनी एमएच-१९ ईवाय-९७६९ क्रमांकाच्या आय-२० कारने त्यांचा पाठलाग केला. वाटेत कारने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याचा आरोप आहे. या धडकेमध्ये ज्ञानेश्वर मोरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर यश गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मोरे यांच्या नातेवाईकांसह समाजबांधवांनी पहूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. संबंधितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी त्यांनी ठिय्या मांडला. त्यामुळे मोठी गर्दी झाली आणि वाहतूक विस्कळीत झाली. अखेर जखमी यश मोरे यांच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
Source link
जामनेर:तक्रार देण्यास जाणाऱ्या पिता-पुत्राला पाठलाग करत भरधाव कारने उडवले