![]()
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात एका महाराजांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रात्री गावात कीर्तन करून मठात परतलेले ह.भ.प. दौलत रामनाथ सातपुते महाराज (वय 41) रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळून आले. पाताळेश्वर मंदिर परिसरातील त्यांच्या राहत्या खोलीत भगव्या रंगाच्या रुमालाच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. विशेष म्हणजे, घटनास्थळावरून त्यांचा मोबाईल फोनही गायब असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मृत्यूभोवतीचे गूढ अधिकच वाढले असून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. या घटनेमुळे अवघडराव सावंगी गावासह भोकरदन तालुक्यात खळबळ उडाली आहे. धार्मिक कीर्तन आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून परिसरात परिचित असलेल्या महाराजांचा अशा परिस्थितीत मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, ही आत्महत्येची घटना आहे की यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. 8 ते 10 वर्षांपासून मठात वास्तव्यास ह.भ.प. दौलत रामनाथ सातपुते महाराज हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील रहिवासी होते. मागील 8 ते 10 वर्षांपासून ते जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या अवघडराव सावंगी येथील पाताळेश्वर मंदिर परिसरातील मठात वास्तव्यास होते. याच ठिकाणाहून ते धार्मिक कार्य आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करीत होते. गावोगावी जाऊन कीर्तन करताना ते समाजातील विविध प्रश्नांवर भाष्य करायचे. विशेषतः तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे, आई-वडिलांची सेवा करावी, सामाजिक जबाबदारी ओळखून राष्ट्रसेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन ते आपल्या कीर्तनातून करीत असत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये त्यांची धार्मिक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख निर्माण झाली होती. रात्री 10 वाजेपर्यंत कीर्तन; त्यानंतर मठात परतले मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अवघडराव सावंगी येथे दौलत सातपुते महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. रात्री सुमारे 10 वाजेपर्यंत त्यांचे कीर्तन सुरू होते. कीर्तनातून समाजप्रबोधन केल्यानंतर ते नेहमीप्रमाणे पाताळेश्वर मंदिर परिसरातील आपल्या मठात परतले. त्यानंतर ते त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी गेले. मात्र, रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे महाराज बाहेर आले नाहीत. बराच वेळ उलटूनही त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडला नसल्याने मंदिर परिसरात येणाऱ्या गावकऱ्यांना काहीतरी अनुचित घडल्याचा संशय आला. सुरुवातीला त्यांनी महाराजांचा इतरत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते कुठेही दिसून आले नाहीत. खोलीत पाहताच गावकऱ्यांना धक्का महाराजांचा बराच वेळ संपर्क होत नसल्याने गावकऱ्यांनी अखेर त्यांच्या राहत्या खोलीत जाऊन पाहणी केली. यावेळी खोलीमध्ये भगव्या रंगाच्या रुमालाच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. रविवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. हे दृश्य पाहताच उपस्थित ग्रामस्थांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती परिसरात पसरताच मंदिर परिसरात नागरिकांनी गर्दी केली. कीर्तन करून रात्री मठात परतलेल्या महाराजांचा काही तासांतच मृत्यू झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. त्यांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली. घटनास्थळावरून मोबाईल गायब; मृत्यूचे गूढ वाढले या प्रकरणात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे महाराजांचा मोबाईल फोन गायब असणे. खोलीत त्यांचा मृतदेह आढळून आला; मात्र घटनास्थळावरून मोबाईल फोन मिळून आला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराजांचा मोबाईल नेमका कुठे गेला? तो हरवला आहे की कोणीतरी घटनास्थळावरून नेला? मृत्यूपूर्वी त्यांचे कोणाशी बोलणे झाले होते का? तसेच शनिवारी रात्री कीर्तन संपल्यानंतर ते मठात परतल्यापासून सकाळी घटना उघडकीस येईपर्यंत नेमके काय घडले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासातून मिळण्याची शक्यता आहे. मात्र, मोबाईल गायब असण्यामागील कारणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पारध पोलिसांकडून तपास सुरू घटनेची माहिती मिळाल्यानंतर पारध पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. महाराजांच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करीत असून, घटनास्थळावरील परिस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कार्यवाही केली जात आहे. दरम्यान, महाराजांचा मृत्यू आत्महत्या आहे की यामागे अन्य काही कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मोबाईल फोन गायब होण्याची बाबही तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासात कोणत्या बाबी समोर येतात आणि या संशयास्पद मृत्यूचे गूढ कधी उलगडते, याकडे आता अवघडराव सावंगी गावासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. मुंबईतील CSMT रेल्वे स्थानाकाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी:पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर; धमकी देणाऱ्याचा शोध सुरू मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या धमकीची माहिती मिळताच मुंबई पोलिस आणि इतर सर्व सुरक्षा यंत्रणा तत्काळ अलर्ट मोडवर आल्या आणि सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने रेल्वे स्थानकावर विविध पथकांना पाचारण करण्यात आले. सविस्तर वाचा….
Source link
जालन्यात कीर्तनानंतर मठात परतलेल्या महाराजांचा संशयास्पद मृत्यू:खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह, मोबाईल गायब