![]()
राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा करत शासनाकडून विविध विकासकामे आणि खर्चांमध्ये काटकसर केली जात असताना पुणे महानगरपालिकेने संस्कृती प्रतिष्ठानच्या मॅरेथॉनसाठी तब्बल ५० लाख रुपयांची देणगी दिल्याचा मुद्दा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पुणेकरांच्या कररूपी पैशांचा वापर खासदार आणि राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीसाठी केला जात असल्याचा आरोप माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. महापालिका आयुक्तांना अशा प्रकारे निधी खर्च करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. धंगेकर म्हणाले, राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना शासन प्रत्येक ठिकाणी निधीचा काटकसरीने वापर करण्याचे धोरण राबवत आहे. नगरसेवकांचे मानधन कपात करण्यापासून ते शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत काटकसरीच्या उपाययोजना करण्यापर्यंत निर्णय घेतले जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दुसरीकडे पुणे महापालिकेने मॅरेथॉनसाठी तातडीने आरटीजीएसद्वारे ५० लाख रुपये दिले आहेत. हा निधी नेमका कोणत्या निकषांवर आणि कोणत्या अधिकारात देण्यात आला, याचा खुलासा प्रशासनाने करावा. मॅरेथॉनसारखा उपक्रम आयोजित करण्यासाठी पाच ते दहा लाख रुपयांतही व्यवस्था होऊ शकते. मात्र, त्यासाठी ५० लाख रुपये देण्यामागील कारण काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. धावपटूंना प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली राजकीय नेत्यांचे ब्रँडिंग आणि प्रसिद्धी करण्यासाठी पुणेकरांच्या पैशांचा वापर होत असेल, तर ते योग्य नाही. अशा कार्यक्रमांसाठी निधी द्यायचाच असेल, तर आयोजकांनी स्वतःच्या पैशातून खर्च करावा, असेही धंगेकर यांनी सुनावले. या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचा दावा धंगेकर यांनी केला. महापालिकेने दिलेल्या ५० लाखांच्या निधीचा निर्णय, त्यामागील प्रशासकीय मान्यता आणि खर्चाचे स्वरूप याबाबत आता प्रशासन काय स्पष्टीकरण देते, याकडे लक्ष लागले आहे.
Source link
महापालिकेने मॅरेथॉनसाठी 50 लाख दिले:रवींद्र धंगेकरांचा निधीच्या निकषांवर सवाल; नेत्यांच्या प्रसिद्धीसाठी कराचा पैसा वापरल्याचा आरोप