Headlines

आजची तरुण पिढी आणि शालेय विद्यार्थी मोबाईलमध्ये जास्त गुंतलेली:जिल्हा परिषदेत भगवान बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन; लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप




जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कासाठी लढा उभारून पर्यावरणासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे थोर क्रांतीकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून कृषी विभागाच्या ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने’अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात कृषी विभागाच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपायुक्त तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नानासाहेब कदम आणि जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा गौरव केला. समाजातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना आणि वंचित घटकांना ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने’चा लाभ मिळावा, यासाठी कृषी विभागाने प्रभावी प्रयत्न करण्याच्या व चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना २०२५-२६ चे लाभार्थी दिनेश पुनमसिंग सिहीरे (रा. बेंदवाडी) आणि हरिचंद लाला ब्रम्हनाथ (रा. बेंबळ्याची वाडी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांना प्रतिनिधी स्वरूपात धनादेशाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जितेंद्र जयस्वाल म्हणाले की, “मोठी माणसं ही मोठीच असतात, त्यामुळे त्यांच्या त्यागाला सतत उजाळा दिला गेला पाहिजे. शेकडो वर्षांनंतरही जनमानसात जिवंत राहणाऱ्या या महापुरुषांचे अनुकरण आपण सर्वांनी केले पाहिजे.” आजची तरुण पिढी आणि शालेय विद्यार्थी मोबाईलमध्ये जास्त गुंतलेली असल्याने त्यांच्यावर शालेय वयातच ‘बालसंस्कार’ होणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आजूबाजूच्या शाळेतील मुलांना अशा महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमांना बोलावल्यास त्यांचे चांगले विचार विद्यार्थ्यांच्या कानावर पडतील. स्वामी समर्थ केंद्रामार्फत जसे बालसंस्कार केले जातात, तसाच प्रयत्न शासनानेही शिक्षण क्षेत्रात करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांनी केली. याप्रसंगी कृष्णा बोरसे, डी. एस. जाधव, छ. संभाजीनगर पंचायत समितीचे कृषी अधिकारी व्ही. जी. अधापुरे, गंगापूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी आर. व्ही. दीक्षित, कृषी विस्तार अधिकारी एस. एस. सरसमकर, सहाय्यक प्रशासन अधिकारी दिलीप निकम यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी प्रवीण सरकलवाड यांनी मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *