Headlines

गुजरातमध्ये शेतमजुरांची मजुरी किती वाढली, जावंधियांचा सवाल:मोहन भागवतांना पत्र; मोदी आणि अमित शहांकडून 25 वर्षांची आकडेवारी जाहीर करण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती




गुजरातमध्ये भाजपची सलग २५ वर्षे सत्ता आहे. या काळात हिंदू शेतमजुरांची रोजंदारी किती वाढली, याची आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया यांनी केली आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना पत्र पाठवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून ही माहिती जाहीर करण्यासाठी भागवतांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती जावंधिया यांनी केली आहे. ग्रामीण भागातील कष्टकरी वर्गाच्या उत्पन्नातील वाढीची आकडेवारीही विकासाच्या दाव्यांसोबत समोर यावी, असे त्यांनी म्हटले आहे. पत्रात जावंधिया यांनी फेब्रुवारी २००८ मध्ये सुरत येथे झालेल्या भारतीय किसान संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा उल्लेख केला आहे. त्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या शोषणाचा मुद्दा आकडेवारीसह मांडण्यात आला होता. शेतकरी आणि शेतमजुरांच्या आर्थिक स्थितीचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. शेतमजुरांच्या मजुरीचा प्रश्न १९७५ पासून सातत्याने उपस्थित करत असल्याचे जावंधिया यांनी पत्रात म्हटले आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह २००६ मध्ये त्यांच्या गावात आले असतानाही त्यांनी हा मुद्दा मांडला होता. त्यानंतर मोदी सरकारलाही पत्र लिहून याबाबत प्रश्न विचारला; मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे जावंधिया यांनी म्हटले आहे. हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याची (सी-२ अधिक ५० टक्के) शिफारस केली होती. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासनही पूर्ण झालेले नाही, असे जावंधिया यांनी पत्रात म्हटले आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट जाहीर केले जात असताना, त्या विकसित भारतात शेतमजुरांची मजुरी किती असेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *