![]()
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या श्रीक्षेत्र जाळीचा देव ते सावळदबारा या रस्त्याला जिल्हा किंवा ग्रामीण मार्ग म्हणून मान्यता देऊन क्रमांक घोषित करावा, अशी मागणी भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे श्री चक्रधर स्वामी यांचे भव्य मंदिर असून, येथे वर्षभरात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यानंतर सर्व भाविक सावळदबारा येथील चक्रधर स्वामी तीर्थक्षेत्रालाही भेट देतात. मात्र, सध्या जाळीचा देव ते सावळदबारा जाण्यासाठी गिरडा घाट मार्गे सुमारे २५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. मुलतानी यांनी निदर्शनास आणून दिले की, दोन्ही धार्मिक स्थळांमधील प्रस्तावित मधला रस्ता विकसित झाल्यास हे अंतर केवळ ५ किलोमीटरवर येईल. यामुळे भाविकांचा २० किलोमीटरचा अतिरिक्त फेरा व वेळ वाचणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या मागणीची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित विभागाकडून तातडीने माहिती मागवून, प्रस्तावाची तांत्रिक तपासणी करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे.
Source link
जाळीचा देव ते सावळदबारा रस्त्याला मंजुरी द्या:इद्रीस मुलतानी यांची मागणी, येथे येणाऱ्या भाविकांचा 20 किलोमीटरचा अतिरिक्त फेरा वाचणार