Headlines

युवकांनी निर्व्यसनी राहून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे:धोडंबे येथील गोरक्षनाथ स्कूलमध्ये डॉ. साळुंके यांचे आवाहन‎




देशाचे भवितव्य असलेल्या युवकांनी व्यसनांपासून दूर राहून आपली ऊर्जा, कौशल्ये, क्षमता राष्ट्रनिर्मितीसाठी वापरावी, असे आवाहन नशाबंदी मंडळाचे नाशिक जिल्हा संघटक तथा मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश साळुंके यांनी केले. जिल्हा समाजकल्याण कार्यालय नाशिक, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य (मुंबई) आणि मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नशामुक्त भारत अभियान सप्ताहा’चा शुभारंभ धोडंबे येथील गोरक्षनाथ स्कूलमध्ये झाला. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे व्यसनमुक्ती शपथविधीत सहभाग घेतला. डॉ. साळुंके यांनी व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून देताना युवकांनी शिक्षण, उत्तम संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात स्वतःला झोकून द्यावे, असे सांगितले. यानिमित्त विद्यालयात व्यसनमुक्ती विषयक जनजागृती फलक प्रदर्शन, घोषवाक्ये आणि मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध संदेश फलकांच्या माध्यमातून व्यसनांचे मानवी शरीरावर आणि समाजावर होणारे दुष्परिणाम प्रभावीपणे मांडले. मुख्य सत्रात सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते. ‘नशामुक्त भारत अभियान सप्ताहा’अंतर्गत जनजागृती रॅली, व्याख्याने, पथनाट्य, विविध स्पर्धा आणि समाजप्रबोधनपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करून निरोगी व सशक्त समाज घडविण्यावर या अभियानाचा भर राहणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *