![]()
आजच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी सर्वच विषयाचे प्राथमिक ज्ञान घेणे महत्वाचे आहे. केवळ पुस्तकी ज्ञान आत्मसात न करता त्यासोबतच विविध प्रकारची अद्यावत माहिती संकलित करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे. विद्यार्थ्यांना करियर करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे, ते क्षेत्र आपण निवडले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मेहनत, संयम व सातत्य आवश्यक असून जर विद्यार्थ्यांमध्ये जिद्द असेल तर कोणत्याही परिस्थितीत करियर घडवता येते, असे प्रतिपादन विदर्भ आयएएस अकादमीचे संचालक प्रा. सागर देवेंद्र भस्मे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन राष्ट्र निर्माण प्रशासकीय अकादमीचे संचालक प्रा.गजानन कोरे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे, आयटी व डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत असलेले पियूष वैराळे, रोशन पडोळे, सुप्रसिद्ध रीलस्टार विशाल पिसाट, स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक प्रा.अंकुश अरबट, प्रा.अंकुश अब्रक, प्रा.राजेश तायडे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना बहुजन राष्ट्रनिर्माण प्रशासकीय अकादमीचे संचालक प्रा.गजानन कोरे म्हणाले, दर्यापूर शहरात १९९५ मध्ये मी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरू केला तेव्हा दर्यापूर तालुक्यातील सुधीर देशमुख हे पोलिस निरीक्षक पदावर विराजमान होणारे पहिले व्यक्ती होते. त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही स्पर्धा परीक्षा क्षेत्रात कार्य केले. आज महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत, त्यामुळे प्रशासकीय सेवेतसुद्धा महिलांची संख्या वाढली पाहिजे. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून महिला निश्चित चांगले कार्य करू शकतात, असे मत जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांनी मांडले. प्रशासकीय सेवेत रुजू होण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते, त्यापेक्षा जास्त मेहनत व संघर्ष हे अधिकारी पदावर विराजमान झाल्यावरही करावी लागते. प्रत्येक अधिकारी यांना कठोर निर्णय घेणे गरजेचे असते. त्यासोबतच माणुसकीही जपावी लागते, असे मत मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान दर्यापूर शहरात कार्यरत असलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकांचा सन्मान करण्यात आला. नुकताच केंद्रीय सेवेत रुजू झालेला शुभम मेश्राम या युवकाचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजक तथा सूर्योदय सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.आशिष देशमुख यांचा सहपत्नी सन्मान करण्यात आला. संचालन प्रा.धनंजय देशमुख यांनी केले. आभार राजश्री देशमुख यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्योदय सामजिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी किरण अरबट, विक्रम नळकांडे, सूरज राऊत, गौरव सांगोले, प्रा.अनिरुद्ध होले, अनिकेत वाकपांजर, स्वप्नील सुलताने ,गौरव नितोने, वैभव धुमाळे व शिव जयंती उत्सव समिती शिवर तसेच शिव मॅरेथॉन आयोजन समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला असंख्य नागरिक, पालक वर्ग व साडेतीनशे विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी कार्यरत दर्यापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी आम्ही सूर्योदय सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम राबवत असतो. पुढील काळातसुद्धा अनेक दर्जेदार उपक्रम राबविण्याचा आमचा मानस असल्याचे सूर्योदय सामाजिक प्रतिष्ठानचे प्रा.आशिष देशमुख यांनी सांगितले.
Source link
जिद्द असेल तरच कोणत्याही परिस्थितीत यश मिळवता येते:प्रा. सागर भस्मे, दर्यापुरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा