![]()
जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम तब्बल तीन वेळा मुदतवाढ देऊनही अद्याप अपूर्णच आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काम पूर्ण नसतानाही कंत्राटदाराला आतापर्यंत तब्बल ५९ पैकी ५७ कोटी रुपयांची बिले अदा करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. प्रशासकीय काळामध्ये कंत्राटदाराला अधिकाऱ्यांनी पाठीशी घातल्यानेच कामाची गती मंदावली. कामाचा दर्जाही राखला गेला नसल्याचे बांधकाम सभापती सचिन गरड यांनी सांगितले. प्रत्यक्ष पाहणी करत सभापती गरड यांनी अधिकारी व कंत्राटदाराला चांगलेच धारेवर धरले आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी ३ सप्टेंबर २०२१ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले. मूळ मुदतीनुसार हे काम ३० महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते. सुरुवातीला या प्रकल्पासाठी ४७ कोटी ३३ लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली. मात्र, नंतर सुधारित मान्यता देत ही रक्कम ५९ कोटी ४१ लाख ८१ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. मुदतीनुसार ३ मार्च २०२४ पर्यंत या इमारतीचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र त्यानंतर कंत्राटदाराला जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. यावेळेत देखील काम पूर्ण न झाल्याने मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. कंत्राटदाराने यावेळी देखील काम पूर्ण न केल्याने अधिकाऱ्यांनी मेहरबानी दाखवत ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. कंत्राटदाराला अदा करण्यात आले आहेत, मात्र काम अजूनही रेंगाळलेलेच आहे. बांधकाम सभापती सचिन गरड यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली असता, कामाची संथ गती, प्रत्यक्ष झालेले काम आणि कंत्राटदाराला दिलेली बिले यात मोठी तफावत असल्याचे उघड झाले. या गंभीर प्रकारावरून गरड यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली आहे. दरम्यान, दीड वर्षांपासून मी लाईटसाठी पाठपुरावा करत आहे. काम न करताच बिल दिले असे वाटत असेल तर सभापतींनी अधिकाऱ्यांची चौकशी करावी. काही कामे अधिकाऱ्यांनीच करण्यास मनाई केली होती. लाईट मिळाल्यास तीन महिन्यात काम पूर्ण करेल अशी माहिती कंत्राटदार एन.के. शेख यांनी दिली. कामे तपासूनच बिले अदा केली वारंवार कामात बदल करण्यात आले त्यामुळे कामाला उशीर लागली आहे. कामे तपासूनच बिले देण्यात आली आहे. निधी व लाईट बाबत प्रशासनाकडून देखील विलंब झाला आहे. निधीची मागणी केली असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता असल्याचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके यांनी सांगितले. दोषींवर कारवाई करण्यात येणार सर्व विभाग वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. कंत्राटदाराने काम मुदतीत पूर्ण केले नाही. अधिकाऱ्यांनी देखील वारंवार मुदतवाढ दिली. अपूर्ण कामाचेही बिले अदा करण्यात आली. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार आहे. – सचिन गरड, सभापती, अर्थ व बांधकाम
Source link
जिल्हा परिषद नवीन इमारतीला 3वेळा मुदतवाढ मिळाली तरीही काम अर्धवटच:सभापती गरड यांनी कंत्राटदार, अधिकाऱ्यांना धरले धारेवर