![]()
जिल्ह्यात ऐन मोक्याच्या टप्प्यावर पावसाने दिलेली प्रदीर्घ उघडीप आणि विविध रोगांचे सावट यामुळे ५.४१ लाख हेक्टरवरील खरीप पिके धोक्यात आली आहेत. ४५ दिवसांतील पावसाच्या खंडामुळे पिकांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती जिल्हा कृषी विभागाच्या टिप्पणीतून समोर आली आहे. जिल्ह्यात कापूस, मका आणि सोयाबीन या तीन प्रमुख पिकांचे मिळून ५ लाख ४० हजार ६४७ हेक्टर क्षेत्र आहे. कृषी विभागाने १३ सप्टेंबरअखेर घेतलेल्या आढाव्यानुसार, यंदा कापसाच्या उत्पादनात ४० टक्के, मका ५० टक्के, तर सोयाबीनच्या उत्पादनात ५० ते ६० टक्क्यांपर्यंत घट होण्याची दाट शक्यता आहे. शेतात पिके उभी असली तरी त्यातून प्रत्यक्ष किती माल घरात येतो, हा मुख्य प्रश्न आहे. उत्पादन घटीचा अंदाज केवळ जिल्हास्तरावर बसून काढलेला नसून तालुक्यांकडून आलेली आकडेवारी आणि काही विद्यापीठांतील शास्त्रज्ञांची मते विचारात घेण्यात आल्याचे जिल्हा कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी स्पष्ट केले. मात्र ही अंतिम नुकसानवारी नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ५.४१ लाख हेक्टर म्हणजे संपूर्ण बाधित क्षेत्र नसले तरी तीन प्रमुख पिकांचे हे एकत्रित क्षेत्र आहे. प्रत्यक्ष पंचनाम्यानंतर बाधित क्षेत्र आणि शेतकऱ्यांची अचूक संख्या समोर येईलच. मात्र हंगाम हातात येण्यापूर्वीच कृषी विभागाच्या कागदावर आलेली ही ४० ते ६० टक्के घटीची आकडेवारी जिल्ह्याच्या अर्थकारणासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. मक्याचे लागवड क्षेत्र २.१२ लाख हेक्टर आहे. कणसे भरण्याच्या अत्यंत निर्णायक टप्प्यावर पिकाला पाण्याचा ताण बसला. त्यामुळे वरून ताट उभे दिसत असले तरी कणसांमध्ये दाणे भरण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. उत्पादनात ५० टक्के घट येणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक २.८३ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड आहे. ऐन फुलोरा, पाते धरण्याच्या काळात पावसाने दांडी मारल्यामुळे पाते आणि फुले गळून पडली आहेत. ४० टक्के घटीचा फटका आर्थिक गणिताला बसणार आहे. ^तालुक्यांकडून आलेली आकडेवारी आणि विद्यापीठांतील शास्त्रज्ञांची मते विचारात घेऊन हा अंदाज आहे. नेमके नुकसान आत्ताच सांगता येणार नाही. बाधित शेतकऱ्यांची संख्याही सध्या अंदाजेच असेल. पावसाच्या खंडामुळे पिकांची अवस्था गंभीर आहे. – दीपक गवळी, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी उत्पादन घटण्याची शक्यता ही पुढील अर्थकारणासाठी धोका पावसाअभावी मोठे नुकसान खरिपात कापसाचे क्षेत्र सर्वाधिक; ४० टक्के घट
Source link
जिल्ह्यात 5.41 लाख हेक्टरचा खरीप धोक्यात:उत्पादनात 60% घट येणार, कृषी विभागाचा अंदाज, 40 दिवसांपासून पावसाचा खंड