![]()
देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. मात्र निजामाच्या हैदराबाद संस्थानातील मराठवाड्याला स्वातंत्र्याची पहाट पाहण्यासाठी आणखी तेरा महिने प्रदीर्घ संघर्ष करावा लागला. अखेर १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामशाहीचा अंत झाला आणि मराठवाडा भारतीय संघराज्यात विलीन झाला. या ऐतिहासिक लढ्यात पैठणचे योगदान मोलाचे राहिले आहे. या संग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणारे हुतात्मा भाऊराव कानडे यांच्या बलिदानाची स्मृती आजही पैठणच्या मातीत आदराने जपली जाते. निजामी राजवटीच्या दडपशाहीविरोधात असंतोष वाढत असताना पैठणमध्ये स्वातंत्र्याची मोठी चळवळ उभी राहिली. शहरातील कापड मंडई परिसरात तिरंगा फडकवून सत्याग्रहाला सुरुवात झाली होती. निजामशाहीच्या अत्याचाराला न जुमानता नागरिकांनी स्वातंत्र्यासाठी आवाज बुलंद केला. यात तरुणांसह सर्वसामान्यांचा मोठा सहभाग होता, असे इतिहास अभ्यासक प्रा. संतोष गव्हाणे यांनी सांगितले. पैठण तालुक्यातील चांगतपुरी परिसरातून भाऊराव कानडे यांनी मुक्तिसंग्रामात प्रत्यक्ष सहभाग घेतला. निजाम समर्थकांच्या दडपशाहीला न घाबरता त्यांनी लढा सुरूच ठेवला. अखेर १९४७ मध्ये त्यांना वीरमरण आले. त्यांच्या बलिदानामुळे पैठणच्या मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाला हुतात्म्याच्या रक्ताची साक्ष लाभली. पैठणला संतांची आणि सातवाहनांची भूमी म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे हुतात्मा भाऊराव कानडे यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास पुस्तकांपुरता मर्यादित न ठेवता पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे दिनेश पारिक, नगरसेवक जितू परदेशी, नगरसेवक बजरंग लिंबोरे यांनी सांगितले. हुतात्मा भाऊराव कानडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पैठण शहरात १९८२ मध्ये स्मारक उभारले गेले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेल्या त्यागाची जाणीव हे स्मारक करून देते. आमदार विलास भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष विद्या कावसानकर यांनी स्मारकाचे सुशोभीकरण, परिसराची स्वच्छता आणि माहिती फलक लावून हा इतिहास जतन करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. १९८२ मध्ये शहरात उभारलेले स्मारक तरुणांसाठी प्रेरणादायी हुतात्म्यांच्या त्यागाची आठवण जागवणारा दिवस : १७ सप्टेंबरचा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा केवळ ध्वजारोहणाचा औपचारिक दिवस न राहता हुतात्म्यांच्या त्यागाची आठवण जागवणारा ठरावा. स्मारकाच्या सुशोभीकरणातून भावी पिढीला हा गौरवशाली इतिहास कळेल यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे आमदार विलास भुमरे यांनी सांगितले.
Source link
13 महिन्यांचा प्रदीर्घ लढा अन् स्वातंत्र्याची नवी पहाट:पैठण येथील हुतात्मा भाऊराव कानडे यांच्या बलिदानाची स्मृती आजही जिवंत