![]()
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या प्रचार मोहिमेदरम्यान सुनेत्रा पवार यांनी बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगताप यांचे नाव न घेता त्यांना थेट आणि कडक इशारा दिला आहे. आपल्या सर्वांचे संबंध चांगले आहेत, नंतर कोण जवळ येणार, अशा अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, कुठल्याही चुकीच्या अफवेला बळी पडू नका. जे एकदा बाहेर गेले, ते कायमचे बाहेर गेले हे नक्की लक्षात ठेवा. दादा खूप मोठ्या मनाचे आहेत, पण मी दादांसारखी नाही, अशा कडक शब्दांत सुनेत्रा पवार यांनी बंडखोरांना सुनावले. यावेळी बोलताना त्यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदाबाबत पसरत असलेल्या अफवांवरही स्पष्टीकरण दिले. सध्या अनेक चुकीच्या अफवा ऐकायला येत आहेत, परंतु कारखान्याचा अध्यक्ष हा सर्वसमावेशक असेल आणि सर्वांच्या मर्जीनुसारच त्याची निवड केली जाईल. आम्ही अध्यक्ष अगोदरच ठरवलेला नाही. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच सर्वांच्या संमतीने अध्यक्ष कोण असेल हे ठरवले जाईल, असेही सुनेत्रा पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. ‘एकदा बाहेर ते कायमचं बाहेर’ सुनेत्रा पवार म्हणाल्या, सगळ्यांचे संबंध अगदी चांगले आहेत. मनात कसं दुखवून नंतर काय होणार, नंतर कोण जवळ येणार, अनेक अफवा आहेत. कुठल्याही चुकीच्या अफवेला बळी पडू नका. एकदा बाहेर ते कायमचं बाहेर, एवढं लक्षात ठेवा. दादा खूप मोठ्या मनाचे होते. दादांसारखी मी नाही. एवढं लक्षात ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा. अनेक अफवा, चुकीच्या अफवा ऐकायला येतात. चेअरमन हा सर्वसमावेशकच असेल. सर्वांच्या मर्जीनुसारच होईल. कोणी कुठलं कोणी आधीच ठरवलेलं नाही. निवडणूक होऊ द्या, नंतर बघू चेअरमनचं कोण असेल तो. अनेक अफवा येतात. कुठल्याही अफवा असतील तर त्या अफवाच आहेत. कसलीही गोष्ट खरी नाही, हे लक्षात ठेवा, असा थेट इशाराच बंडखोरांना दिला आहे. तिरंगी लढत आणि दिग्गजांचा झंझावाती प्रचार सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आता केवळ तीन दिवस उरल्याने प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादीतून बंडखोरी करून भाजपच्या साथीने पॅनेल उभे करणारे पुरुषोत्तम जगताप अशी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार आणि जय पवार गावोगावी जाऊन बैठका घेत आहेत; तर शरद पवारांच्या पक्षासाठी युगेंद्र पवार एकाच दिवसात वीस-वीस गावांचा दौरा करत आहेत. दुसरीकडे, भाजपच्या साथीने रिंगणात उतरलेले बंडखोर नेते पुरुषोत्तम जगताप आणि भाजपचे माजी आमदार संजय जगताप यांनीही पायाला भिंगरी लावून प्रचाराचा धडाका लावला आहे. गाठीभेटींवर भर आणि निवडणुकीचे वेळापत्रक प्रचाराचे अवघे शेवटचे तीन दिवस शिल्लक राहिल्याने सर्वच उमेदवारांनी आणि नेत्यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. या अंतिम टप्प्यात मोठ्या जाहीर सभा घेण्याऐवजी घरोघरी जाऊन मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर सर्वांकडूनच विशेष भर दिला जात आहे. या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस 9 तारखेला असून, कारखान्याच्या 21 जागांसाठी येत्या 11 तारखेला प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे.
Source link
'जे एकदा बाहेर गेले, ते कायमचे बाहेर गेले':दादा खूप मोठ्या मनाचे आहेत, पण मी दादांसारखी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा