Headlines

मनोज जरांगे 'संघर्षयोद्धा' नव्हे तर 5000 कोटींचा टेंडर योद्धा!:विखे-पाटलांशी संगनमत करून कंत्राटे लाटली; अजय बारस्करांचा आरोप, कागदपत्रे ईडीला सोपवणार




“मनोज जरांगे हे आता मराठा समाजाचे संघर्षयोद्धा राहिलेले नसून ते भ्रष्ट कंत्राटदारांची टोळी चालवणारे ‘टेंडर योद्धा’ बनले आहेत. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी छुपे संगनमत करून जरांगेंच्या टोळीने तब्बल 5,426 कोटी रुपयांचे टेंडर मॅनेज केले असून त्यापैकी 3,770 कोटी रुपयांची कामे थेट पळवली आहेत. एका बाजूला मराठ्यांच्या मुलांचे रक्त सांडवायचे आणि दुसऱ्या बाजूला समाजाची विक्री करून तिजोरी भरायची, असा हा पापाचा उद्योग सुरू आहे,” असा खळबळजनक आणि गंभीर आरोप अजय बारस्कर यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बारस्कर यांनी जरांगे पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या कथित आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे दाखवत सडकून टीका केली. तसेच, या महाघोटाळ्याची सर्व कागदपत्रे अंमलबजावणी संचालनालयाकडे (ED) देणार असल्याचे जाहीर केले. नातेवाईक वाळूचोर, कंत्राटदारांची टोळी अन् विखे-पाटलांचे 5000 कोटी! जरांगेंच्या आर्थिक सिंडिकेटचा पाढा वाचताना अजय बारस्कर म्हणाले, “जरांगे यांच्या घरातील लोक वाळूचोरीत गुंतलेले आहेत. मनोज जरांगे यांच्या पत्नीचा भाऊ विलास खेडकर हा उघडपणे वाळूचोरी करतो. त्यांचा ‘अदृश्य हात’ असलेला संजय कटारे हादेखील वाळूचोर असून, त्याने मार्च 2023 मध्ये 4 कोटी रुपयांहून अधिक रकमेची वाळू चोरली होती. ब्लॅकलिस्टमध्ये असलेल्या आणि अवघा आयटीआय पास असलेल्या या कंत्राटदाराला 14 कोटी रुपयांची शासकीय कामे कशी मिळतात? छत्रपती संभाजीनगरातील प्रोझोन मॉलसमोरील क्रीम एरियात कोट्यवधींचा प्लॉट खरेदी करण्यासाठी यांच्याकडे पैसा कुठून आला?” विखे-पाटलांशी अर्थपूर्ण संगनमत “कंत्राटदार किशोर बलांडे हा थेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गाडीतून आंदोलनाच्या ठिकाणी आला होता. त्यानंतर आंदोलनाच्या मंचावर त्याला स्थान मिळाले. विखे-पाटलांनी या सिंडिकेट टोळीला टेंडरसाठी 5,426 कोटी रुपयांची कामे उपलब्ध करून दिली. त्यातील 3,770 कोटी रुपयांच्या निविदा बलांडे, पाटील, धुमाळ अशा पाच-सहा कंत्राटदारांनी संगनमताने पळवल्या आहेत.” शेतकऱ्यांचे 82 कोटी वळवले “गरज नसलेल्या कामांची बनावट सूची तयार करण्यात आली. अंदाजपत्रके अवाजवी फुगवून निविदा मॅनेज केल्या गेल्या. शेतकऱ्यांच्या दुष्काळी अनुदानाचे आणि मदतीचे 82 कोटी रुपये काढून बलांडे आणि मेंगरे या कंत्राटदारांच्या घशात घालण्यात आले आहेत.” जमीन खरेदी आणि बंद खोलीतील गुप्त बैठकांवरून सवाल जरांगे यांच्या गरीब आणि साध्या राहणीमानाच्या दाव्यावर बोट ठेवत बारस्कर यांनी संपत्तीचा मुद्दा लावून धरला. “जरांगे नेहमी भाषणात सांगतात की मराठ्यांवर जमिनी विकण्याची वेळ आली आहे; मग त्यांच्या सख्ख्या पुतण्याने (स्वस्तिक) करोडो रुपयांची जमीन कशी खरेदी केली? आप्पासाहेब कुढेकर याच्या नावाने तब्बल 98 एकर जमीन कशी घेतली गेली? या अफाट संपत्तीचा स्रोत काय?” अशोक चव्हाण व विखेंसोबत बंद खोलीत काय शिजले? “मी कधीही बंद खोलीत चर्चा करत नाही, असा आव आणणाऱ्या जरांगेंनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत बंद दाराआड काय खलबते केली? तसेच, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जरांगे एकत्र असताना माध्यमांच्या प्रतिनिधींना खोलीबाहेर का काढण्यात आले? तिथे नेमकी कोणती सौदेबाजी झाली?” असा थेट सवाल त्यांनी विचारला. तीन वर्षांच्या ‘माणिक इन्फ्रा’वर 635 कोटींची मेहरबानी शासकीय निविदांमधील गैरव्यवहाराचा तपशील देताना त्यांनी एका कंपनीचे नाव उघड केले. “कमी दरात आणि गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या इतर अनुभवी कंपन्यांच्या निविदा हेतुपुरस्सर नाकारण्यात आल्या. केवळ तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ‘माणिक इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीला विखे-पाटलांच्या आशीर्वादाने तब्बल 635 कोटी रुपयांचे काम देण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत अधिकारी आणि प्रशासन हतबल झाले असून, हे एका मोठ्या टोळीचे संघटित गुन्हेगारी कृत्य आहे.” जरांगे म्हणजे आधुनिक ‘रहमान डकैत’; सर्व पुरावे ईडीला देणार! जरांगेंच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत धिक्कार करत बारस्कर म्हणाले, “कोणी कायदेशीर मार्गाने पैसे कमवले तर आमचा विरोध नाही. पण मराठा आरक्षणाच्या नावाखाली निष्पाप समाजाच्या भावनांशी खेळून आणि समाजाला विकून उभे केलेले हे पापाचे साम्राज्य मी उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही. मनोज जरांगे हा समाजसेवक नसून आधुनिक ‘रहमान डकैत’ आहे.” तनिष्क दुकानामागे लपलेली टोळी “कृष्णा खोरे विकास महामंडळातील कामांमध्ये गैरव्यवहार करणारा हेमंत ऊर्फ हणमंत धुमाळ आणि त्याची टोळी पुण्यातल्या मोठ्या दुकानांच्या आणि सराफी पेढ्यांच्या मागे लपली आहे. जरांगे स्वतः सांगत होते की त्यांच्या पत्नी भीक मागायच्या, तीन महिने 500 रुपयांची नोट पाहिली नाही; पण आज त्यांच्या दिमतीला असलेल्या आलिशान गाड्या कंत्राटदार किशोर बलांडे यांच्या आहेत. जरांगे हे पूर्णपणे विखे-पाटलांचे आणि सरकारचे लाडके प्यादे आहेत.” जिवाला धोका, पोलिसांचे दुर्लक्ष “या संपूर्ण महाघोटाळ्याची बँक खाती आणि आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे मी लवकरच थेट ईडीकडे (ED) सोपवणार आहे. हा महाघोटाळा उघड केल्यामुळे माझ्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे; मात्र तक्रार करूनही पोलीस मला पुरेशी सुरक्षा देत नाहीत,” अशी व्यथा अजय बारस्कर यांनी शेवटी मांडली. ———————————————–
हेही वाचा… रोहित पवारांच्या आंदोलनात 80% गुंड!: नवनाथ बन यांचा ‘व्हिडिओ बॉम्ब’ टाकून खळबळजनक आरोप; दिवसभर आंदोलनात, मध्यरात्री दारू पिऊन मुलीवरून राडे पुण्यात सुरू असलेले आंदोलन हे एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांचे नसून आमदार रोहित पवार यांनी प्रायोजित केलेला हा शुद्ध राजकीय कार्यक्रम आहे. या आंदोलनात केवळ 20 टक्के निरागस विद्यार्थी असून, उर्वरित 80 टक्के हे बारामती ॲग्रोचे कर्मचारी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि रोहित पवारांचे गुंड आहेत. हे कार्यकर्ते दिवसभर आंदोलनाच्या मंचावर बसून भाषणे ठोकतात आणि मध्यरात्री पुण्याच्या रस्त्यांवर मद्यधुंद अवस्थेत नाइट लाइफ एन्जॉय करत मुलींवरून राडे घालतात,” असा खळबळजनक ‘व्हिडिओ बॉम्ब’ फोडत भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत रोहित पवार आणि त्यांच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *