![]()
श्री क्षेत्र लखमाजी महाराज संस्थान, बाग (वनोजा) येथून निघालेली आषाढी पायी पालखी दि. २६ जून रोजी दुपारी चोहोट्टा बाजार येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात दाखल झाली. श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या या पालखीचे स्थानिक ग्रामस्थांनी व भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत करून वारकरी परंपरेचा गौरव जपला. अकोला-अकोट मुख्य महामार्गावरील प्रमुख चौकातून पालखीचे आगमन होताच अवघा परिसर टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “ज्ञानोबा-तुकाराम’च ्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. पालखीत सहभागी झालेल्या शेकडो वारकरी भाविकांनी अभंग, भजन आणि हरिनामाच्या अखंड गजरात आपला अध्यात्मिक प्रवास सुरू ठेवला आहे. पालखी चोहोट्टा बाजार येथे येताच दर्शनासाठी भाविकांची एकच गर्दी झाली होती. यावेळी ग्रामस्थ, महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी पालखीचे मनोभावे दर्शन घेऊन संत परंपरेप्रती आपली प्रगाढ श्रद्धा व्यक्त केली. वारकरी संप्रदायातील शिस्त, समता आणि अपूर्व भक्तीभावाचे दर्शन या सोहळ्यात घडून आले. चोहोट्टा बाजार येथे अल्प विश्रांती (विसावा) घेतल्यानंतर पालखी पुढील प्रवासासाठी श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. आषाढी वारीच्या निमित्ताने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला असून वारकऱ्यांच्या सेवेसाठी नागरिकांनीही ठिकठिकाणी उत्स्फूर्त सहभाग नोंदवतांना दिसून येत आहेत. पालखीचे चोहोट्टा बाजार येथे आगमन होताच स्थानिक सामाजिक संस्था, तरुण मंडळे आणि ग्रामस्थांच्या वतीने वारकरी भाविकांसाठी फराळ, शुद्ध पिण्याचे पाणी आणि अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. वारकऱ्यांसाठी सेवाकार्याची लगबग; शिस्तीचे घडते दर्शन
Source link
टाळ-मृदंगाच्या गजरात लखमाजी महाराज पालखी पंढरपूरकडे रवाना:चोहोट्टा बाजार येथे पालखीचे भाविकांकडून उत्साहात स्वागत