Headlines

टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणाऱ्यांनाही महाराष्ट्राच्या मातीत गाडू:टिपू असता तर काँग्रेसचे नेते हिंदू म्हणून श्वास तरी घेऊ शकले असते का?; नितेश राणेंचा अमित देशमुखांवर घणाघात




लातूर शहरात आयोजित टिपू सुलतान जयंतीच्या कार्यक्रमात काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार अमित देशमुख यांनी टिपू सुलतानच्या मार्गावर चालण्याचे आणि तरुणांना त्यांच्या जीवनावरील पुस्तके वाटण्याचे आवाहन केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. देशमुख यांच्या या वक्तव्याचा आणि समाजमाध्यमांवरील पोस्टचा मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत तिखट शब्दांत समाचार घेतला आहे. “ज्या टिपू सुलतानने हजारो हिंदूंची कत्तल केली, मंदिरे लुटली आणि आया-बहिणींवर अत्याचार केले, त्याचे उदात्तीकरण करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. जर टिपू सुलतान आज जिवंत असता, तर स्वतःला हिंदू म्हणवून घेणारे काँग्रेसचे नेते हिंदू म्हणून श्वासही घेऊ शकले असते का? ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी औरंगजेबाला महाराष्ट्राच्या भूमीत गाडले, अगदी तसेच टिपू सुलतानचे समर्थन करणाऱ्यांनाही गाडण्याची ताकद हिंदू समाजात आहे,” असा सणसणीत इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. नेमका वाद कशामुळे पेटला? अमित देशमुख काय म्हणाले होते? लातूरमध्ये काँग्रेस खासदार शिवाजी काळगे यांच्या पुढाकाराने टिपू सुलतान जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार अमित देशमुख यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली आणि टिपू सुलतानच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर उपस्थितांना संबोधित करताना देशमुख म्हणाले की, “आज आपण सर्वजण इथे एकत्र आलो आहोत, पण येणाऱ्या पिढ्यांना टिपू सुलतान कोण होते, त्यांनी काय कार्य केले आणि त्यांच्या विचारांचा वारसा काय आहे, हे समजावून सांगणे गरजेचे आहे.” “लातूरमधील नवतरुणांना टिपू सुलतान यांच्या जीवनावरील पुस्तके उपलब्ध करून दिल्यास ते एक मोठे नेक काम ठरेल. यासाठी माझ्याकडून लागणारी सर्व प्रकारची मदत यापूर्वीही केली आहे आणि यापुढेही करत राहीन,” अशी ग्वाही अमित देशमुख यांनी दिली. सोशल मीडिया पोस्टवरून वाद या कार्यक्रमानंतर देशमुख यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत टिपू सुलतान यांचा उल्लेख ‘शेर-ए-हिंद शहीद हजरत टिपू सुलतान’ असा केल्याने भाजप नेते अधिकच आक्रमक झाले आहेत. आजवर एमआयएम उदोउदो करायचे, आता काँग्रेसही तेच करतेय – नितेश राणे अमित देशमुख यांच्या या भूमिकेवर भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. हिन्दवी स्वराज्यात जिहादी प्रवृत्तींचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही, असे ठणकावत राणे म्हणाले की, “ज्या टिपू सुलतानने मोठ्या प्रमाणावर सक्तीचे धर्मांतर घडवून आणले, हिंदू धर्म संपवण्याचा कट रचला, हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त केली आणि माता-भगिनींवर अत्याचार केले, अशा व्यक्तीचा गौरव काँग्रेस नेत्यांना का करावासा वाटतो? आजपर्यंत केवळ एमआयएम (AIMIM) पक्ष टिपू सुलतानचा उदोउदो करत होता; पण दुर्दैवाने आज काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री अमित देशमुख हेच काम करत आहेत.” पुढे बोलताना नितेश राणे यांनी देशमुख यांना इतिहासाची जाणीव करून दिली. टिपू सुलतानचे राज्य असते तर आजचे काँग्रेसमधील हिंदू नेते सुरक्षित राहिले नसते, ही गोष्ट अमित देशमुखांनी विसरू नये. सनातन हिंदू धर्माच्या विरोधात जाऊन टिपू सुलतानचे समर्थन करणाऱ्या आणि त्याच्या नावाने पुस्तके वाटण्याची भाषा करणाऱ्या प्रवृत्तींना धडा शिकवण्याची ताकद या महाराष्ट्रातील हिंदू समाजात आहे, असा इशाराही त्यांनी दिला. या आरोप-प्रत्यारोपांमुळे लातूरसह संपूर्ण राज्यात इतिहासाच्या आणि महापुरुषांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा नवा राजकीय संघर्ष उभा राहिला आहे. ——————————————————————– हेही वाचा… शिवसेना प्रकरणाचा निकाल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागण्याची शक्यता: संजय राऊत यांचा दावा, दुष्काळ निधीवरूनही सरकारवर टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना खटल्याची सुनावणी, राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि केंद्र सरकारच्या धोरणांवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली असून, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अंतिम निकाल लागेल आणि आम्ही त्याबाबत पूर्णपणे आशावादी आहोत, असा दावा राऊत यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *