Headlines

ठाण्यात बस चालकाला लाकडी दांड्याने मारहाण:डोक्यात फटका बसल्याने बस चालक बेशुद्ध; पाहा घटनेचा भयंकर VIDEO




मिरा – भाईंदर महापालिकेच्या बस चालकाला लाकडी दांड्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे. या घटनेत बस चालकाच्या डोक्यात फटका बसल्यामुळे तो जागीच बेशुद्ध झाला. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात हल्लेखोर बस चालकाला भयंकर पद्धतीने मारहाण करताना दिसून येत आहेत. यासंबंधीच्या माहितीनुसार, एका दुचाकीस्वाराने धावत्या बसला कट मारल्याच्या किरकोळ कारणामुळे ही घटना घडली. बसला कट मारल्यामुळे बस चालक व दुचाकीस्वार यांच्यात वाद झाला. गाडीतील प्रवाशांच्या मध्यस्थीने हा वाद थांबला. पण त्यानंतर दुचाकीस्वाराने बसचा पाठलाग केला. अखेर कोपरी येथे बस शेवटच्या स्थानकावर थांबली असता दुचाकीस्वार आपल्या सहकाऱ्यांसोबत बसमध्ये चढला आणि त्याने बस चालकावर लाडकी दांड्याने हल्ला चढवला. त्याने बसच्या सीटवर बसलेल्या चालकाला बेदम मारहाण केली. यावेळी बसवाहक आपल्या सीटवर बसला होता. त्यानेही या हल्लेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी त्यालाही धमकावले. घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद या घटनेचा संपूर्ण थरार बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला आहे. त्यात हल्लेखोर बस चालकाला अत्यंत वाईट पद्धतीने मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. आरोपींनी बस चालकाला प्रथम त्याच्या सीटवर बसल्याच्या स्थितीत मारहाण केली. त्यानंतर त्याला खेचून खाली रस्त्यावर आणले. तिथेही त्याला जबर मारहाण करण्यात आली. यावेळी एक फटका चालकाच्या डोक्यात बसला. त्यामुळे तो जागीच बेशुद्ध झाला. पण त्यानंतरही त्याला सुरू असणारी मारहाण थांबली नाही. ही मारहाण पाहून कुणीतरी त्याची माहिती पोलिसांना कळवली आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हा प्रकार नियंत्रणात आला. या घटनेनंतर पीडित बस चालकाने लगतच्या पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तसेच पुरावा म्हणून बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही दिले. त्यावरून पोलिसांनी आरोपी नीलेश शिंदे व त्याच्या सहकाऱ्यांविरोधात खूनाचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणणे आदी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलढाण्यात नमाज पठणावेळी राडा दुसरीकडे, बुलढाणा शहरात शुक्रवारी दुपारी नमाज पठणावेळी एकाच समाजातील 2 गटांत झालेल्या वादात 8 जण जखमी झालेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, इकबाल चौकातील जामा मशिदीच्या ट्रस्टमध्ये मागील 3 वर्षांपासून अंतर्गत वाद सुरू आहेत. हाफीज रहमत हे गेल्या 30 वर्षांपासून या मशिदीत नमाज पठण करत आहेत. पण आता त्यांचे वय झाले आहे. ते वारंवार आजारी पडतात, असे नमूद करत मशीद ट्रस्टचे ट्रस्टी इलियास कच्ची यांनी त्यांना नमाज पठणापासून रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्याला परिसरातील नागरिकांनी कडाडून विरोध केला. जामा मशीद ही सर्वांसाठी असून, तिथे कोणत्याही एका समुदायाची मक्तेदारी नसावी, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर शुक्रवारी दुपारी 2 वा. हाफीज रहमत नमाजासाठी आले असता ट्रस्टच्या वतीने त्यांना विरोध करण्यात आला. यावेळी दोन्ही गटांत मोठा वाद झाला. यावेळी त्यांनी एकमेकांवर दगडफेकही केली. त्यात दोन्ही गटांचे लोक जखमी झाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *