Headlines

अजिंठा डोंगररांगालगतची ‘घटोत्कच लेणी’ दुर्लक्षित:संवर्धन, सुविधांची आवश्यकता, दिशादर्शक फलक, रस्ता अन् सुरक्षित पायवाटेअभावी पर्यटकांची मोठी कोंडी‎




अजिंठा लेण्यांच्या जागतिक वैभवामुळे सोयगाव तालुक्यातील जंजाळा परिसरातील ऐतिहासिक ‘घटोत्कच लेणी’ आजही दुर्लक्षितच आहेत. बौद्ध स्थापत्यकलेचा अमूल्य वारसा लाभलेल्या या लेणी समूहाकडे पुरातत्त्व विभाग आणि पर्यटन यंत्रणेचे साफ दुर्लक्ष झाले आहे. थेट वाहनमार्ग, दिशादर्शक फलक आणि सुरक्षित पायवाट यांसारख्या मूलभूत सुविधांअभावी पर्यटकांची प्रचंड गैरसोय होत असून हा ऐतिहासिक ठेवा पर्यटनाच्या प्रतीक्षेत आहे. अजिंठा लेण्यांपासून सुमारे १८ किलोमीटर पश्चिमेला वसलेल्या या घटोत्कच लेणी समूहात एक चैत्यगृह आणि दोन विहार आहेत. इ. स. पाचव्या ते सहाव्या शतकातील वाकाटककालीन बौद्ध स्थापत्याचा हा उत्कृष्ट नमुना मानला जातो. लेण्यांमध्ये भव्य बुद्धप्रतिमा, नक्षीदार कोरीव खांब, शिल्पे आणि विहारांची वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहायला मिळते. विशेष म्हणजे, या परिसरात वाकाटक राजा हरिषेणाचा मंत्री वराहदेव याच्याशी संबंधित ऐतिहासिक शिलालेख आढळतो. अजिंठा येथील लेणी क्रमांक १६ च्या निर्मितीशीही वराहदेवाचा थेट संबंध असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. घटोत्कच लेणीतील शिलालेखात बुद्ध, धम्म आणि संघ यांच्या उल्लेखासह वराहदेवाच्या वंशावळीची माहिती आढळते. एवढा मोठा ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय संदर्भ असूनही ही लेणी पर्यटकांच्या नजरेपासून दूर राहिली आहे. अजिंठा लेण्यांपासून सुमारे १८ किलोमाटर पश्चिेमला वसलेली घटोत्कच लेणी. पुरातत्त्वीय महत्त्व अबाधित ठेवून संवर्धन अन् विकासाची गरज अजिंठा लेण्यांच्या अगदी जवळ असूनही घटोत्कच लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे पर्यटकांना खडतर पाऊलवाटेने पायीच प्रवास करावा लागतो. परिसरामध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे किंवा सुरक्षेची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. या ऐतिहासिक वास्तूचे मूळ स्वरूप आणि पुरातत्त्वीय महत्त्व अबाधित ठेवून शास्त्रीय पद्धतीने संवर्धन व विकास करण्याची अत्यंत गरज आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *