![]()
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या सुरू असलेल्या चर्चांवर महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा गट हा आमच्या महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे. पवारसाहेब स्वतः महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या पक्षात काय चाललंय याबद्दल तर्कवितर्क करणे योग्य होणार नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. तसेच, या राजकीय घडामोडींमागील राष्ट्रीय पातळीवरील समीकरणांकडे लक्ष वेधताना ते म्हणाले की, नरेंद्र मोदींना डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयक मंजूर करायचे आहे आणि त्यासाठी त्यांना 15-16 खासदारांची गरज आहे. त्यामुळेच त्यांचा शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, नरेंद्र मोदींना परिसीमन विधेयक म्हणजे डिलिमिटेशन बिल आणायची घाई झालेली आहे. ते विधेयक महिला आरक्षणाचे नाव सांगून पुढे केले जात आहे. पण ही निव्वळ फसवणूक आहे, कारण महिला विधेयक 2023 मध्ये पारित झालेले आहे. पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आता नवीन महिला विधेयक काय आणणार त्यांना परिसीमन करायचं आहे जो त्यांचा अधिकार आहे. पण परिसीमन करताना दक्षिणेच्या राज्यावर अन्याय होणार नाही हा मुख्य मुद्दा आहे. मला असं वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेस बाबत जी चर्चा सुरु आहे, ती यासाठी चालू आहे की त्यांना परिसीमन विधेयक पास करण्यासाठी 15-16 मतांची गरज आहे. कारण ते घटना दुरुस्ती विधेयक आहे आणि 15-16 मतं कशी गोळा करायची हा प्रश्न आहे. कदाचित त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आठ खासदारांवर डोळा आहे.हे खासदार आले तर आपली ती संख्या पूर्ण व्हायला मदत होईल आणखी मग पाच ते सात मतं लागतील. पण ती मिळवतील कारण सगळाच पैशाचा खेळ चाललेला आहे. मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय बदल होणार आहेत याचा थेट संबंध नरेंद्र मोदींना डिलिमिटेशन विधेयक पारित करायचे त्याच्याशी आहे. आता पुढे काय घडतं हे दोन-तीन दिवसात आपल्याला कळेल, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तसेच मला वाटतं की शरद पवारांची राजकीय पार्श्वभूमी आपण पाहिली तर त्यांना एक लेफ्ट ऑफ सेंटर बॅकग्राऊंड आहे. त्यांच कुटुंब, त्यांचे वडील वगैरे सगळे हे शेतकरी कामगार पक्षाची पार्श्वभूमीची मंडळी होती.इतकी वर्ष त्यांनी बहुतेक काही अपवाद सोडता लेफ्ट ऑफ सेंटर राजकारण केलेल आहे. फुले-शाहू-आंबेडकर विचार मांडलेला आहे.आता साठ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीनंतर ते जर भाजप बरोबर गेले किंवा मग जातीयवादी पक्षांना त्यांनी साथ दिली तर मग हे वैयक्तिक स्वार्थासाठी केलं असा त्याचा अर्थ होईल. मला वाटत नाही ते काय असं करतील, असेही चव्हाण यांनी म्हटले. मला स्वतःला वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार काही एनडीए बरोबर जाणार नाही. पण शेवटी काय होईल काय सांगता येत नाही, भेटीगाठी आपण पाहतोय. परंतु भारतीय राजकारणावर त्याचा परिणाम अवश्य होईल. इंडिया आघाडीवर त्याचा परिणाम अवश्य होईल. कारण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन जर एनडीएकडे गेली तर मग निश्चितच इंडिया आघाडीचा एक घटक पक्ष बाजूला होईल. आमची ताकद थोडी कमी होईल, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
Source link
डिलिमिटेशन विधेयक पास करण्यासाठी केंद्राला 15-16 मतांची गरज:मोदींचा शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा