Headlines

दोन्ही शिवसेना एकत्र येणार?:खासदार ओमराजे निंबाळकरांच्या विधानावर आदित्य ठाकरेंचे सूचक उत्तर, नेमके काय म्हणाले ठाकरे?




दिवाळीच्या सणादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चा रंगत असताना, आता शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाचा मुद्दाही चर्चेत आला आहे. दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर माझ्यापेक्षा जास्त आनंदी माणूस दुसरा कोणीही नसेल, असे विधान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकतेच केले होते. त्यांच्या या विधानावर आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात किल्ले बांधणी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी या विषयावर आपले मत मांडले. दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या विधानावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी अत्यंत सूचक प्रतिक्रिया दिली. मी दोन पूल मेट्रोचे एकत्र करणार आहे, ते बघायला इथे आलो आहे. ओमराजेंच्या प्रश्नावर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी त्यांना उत्तर दिले आहे, असे म्हणत आदित्य यांनी नुकत्याच पुण्यात झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची आठवण करून दिली. दरम्यान, निंबाळकर यांनी आपल्या विधानात हेही स्पष्ट केले होते की, दोन्ही शिवसेना एकत्र आणण्याचा निर्णय हा वरिष्ठ नेत्यांचा विषय आहे आणि आपण केवळ एक सामान्य कार्यकर्ता आहोत. तरीही त्यांनी एकत्रीकरणाची इच्छा बोलून दाखवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी छठ पूजेच्यासंदर्भात देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, छठ पूजेसंदर्भात निवडणूका आल्या की वाद करतात, जातीचा वाद घातला जातो, या सर्व गोष्टी भाजप स्पॉन्सर्ड आहेत, महागाईपासून लक्ष विचलीत करण्यासाठी असे मुद्दे पुढे आणले जातात. तसेच विरोधी पक्ष आम्ही राज्यभर आंदोलन करत आहोत, विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले आहेत, रिजीम चेंज होणार, नक्की होणार, बदल होणार, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरे यांनी पुण्यात बोलताना चाकण एमआयडीसी परिसरातील समस्यांवरून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. एमआयडीसीमध्ये जो भ्रष्टाचार सुरू आहे, त्यावर कुणी बोलत नाही, रस्ते नाहीत, प्रदूषण वाढले आहे, त्यावर सरकारला बोलायला वेळ नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबतच्या चर्चेवर विचारले असता, दुसऱ्या दोन पक्षांबद्दल मी काही सांगू शकत नाही, त्यावर मी बोलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, राहुल गांधी यांच्या फोन टॅपिंगसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना, पेगासससारख्या वेगवेगळ्या माध्यमातून फोन टॅप केले जातात, हे नेमके कुणासाठी वापरले पाहिजे हे सरकारला समजत नाहीये, ते दहशतवाद्यांसाठी वापरलं पाहिजे, अशी चपराकही आदित्य ठाकरे यांनी सरकारला लगावली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *