Headlines

डीजे-दणदणाट संस्कृतीला शोभत नाही:लोकमान्य टिळकांचे खापर पणतू रोहित टिळकांचा मंडळांना स्पष्ट संदेश; उत्सवाला गालबोट लागेल असे काही करू नका!




गणेशोत्सवाची परंपरा सुरू करणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे खापर पणतू रोहित टिळक यांनी आज गणेशोत्सवाचे बदललेले स्वरूप आणि वाढत्या डीजे संस्कृतीवर परखड मत व्यक्त केले. सार्वजनिक गणेशोत्सवाची मूळ संकल्पना समाज संघटन होती, मात्र आजकाल आवाजाची मर्यादा ओलांडून लावले जाणारे डीजे आणि त्यावरील दणदणाट हा आपल्या संस्कृतीला शोभणारा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. डीजे आणि ध्वनीप्रदूषणावर आक्षेप रोहित टिळक यांनी सांगितले की, “सध्या गणेशोत्सवात अत्यंत मोठ्या डेसिबलवर डीजे आणि साऊंड सिस्टीमचा वापर केला जातो, ही प्रथा पूर्णपणे चुकीची पडली आहे. ही कधीच गणेशोत्सवाची मूळ परंपरा नव्हती. या दणदणाटामुळे लोकांच्या तब्येतीला त्रास होतो, घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटतात आणि कानाच्या पडद्यांनाही इजा होते. गणरायाचा उत्सव साजरा करताना अशा प्रकारची भूमिका घेणे अजिबात योग्य नाही.” त्यांनी सर्व मंडळांना स्वतःहून निर्बंध घालून पारंपरिक वाद्यांकडे वळण्याचे आवाहन केले आहे. “केसरीवाड्याने नेहमीच ध्वनीप्रदूषणाची काळजी घेतली आहे आणि कधीही डीजेचा वापर केला नाही,” असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. सार्वजनिक उत्सवांचे महत्त्व आणि सोशल बाँडिंग धार्मिक उत्सवांच्या आवश्यकतेवर भर देताना टिळक म्हणाले की, “आज भारताची १४० कोटी लोकसंख्या एकत्र बांधून ठेवायची असेल, तर अशा उत्सवांची नितांत गरज आहे. लोकमान्य टिळकांनी समाज एकत्र यावा आणि ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठावा म्हणून हा उत्सव सुरू केला होता. आजच्या काळात लोक ‘आयसोलेशन’मध्ये (एकटेपणात) राहतात. शेजारी कोण राहते हेही अनेकांना माहीत नसते. पण, गणेशोत्सवासारख्या धार्मिक व्यासपीठामुळे लोक स्वतःहून बाहेर येतात, त्यांची एकमेकांशी ओळख होते आणि एक भक्कम ‘सोशल बाँडिंग’ निर्माण होते.” परदेशातही गणेशोत्सवाची पाळेमुळे रोहित टिळक यांनी परदेशातील गणेशोत्सवाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, “मी गेल्या काही वर्षांपासून परदेशात जातोय. यावर्षी नेदरलँडला जाणार आहे, जिथे लोकमान्यांच्या प्रेरणेतून कम्युनिटीने एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. तिथे ढोल-ताशा पथके लावून मिरवणूक काढली जाते. परदेशातही लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि एकमेकांना मदत करण्यासाठी हे उत्सव महत्त्वाचे ठरत आहेत.” वारी आणि श्रद्धा: शेतकऱ्यांचे कवच वारीचे उदाहरण देत त्यांनी श्रद्धेचे महत्त्व विशद केले. “शेतकऱ्यांना दुष्काळ, गारपीट अशा अनेक संकटांना सामोरे जावे लागते. तरीही ते महिनाभर पांडुरंगाच्या सेवेसाठी वारीला येतात. ही अफाट श्रद्धा त्यांच्यासाठी एका कवचासारखी काम करते. हे कवच नसले तर कदाचित आत्महत्येचे प्रमाण आणखी वाढेल. त्यामुळे भारताच्या या सांस्कृतिक ठेव्याचे रक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. परंपरेकडे वळण्याचे आवाहन अवाढव्य मंडप आणि रस्ते अडवण्याच्या प्रकारांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “पुणे शहराची गणेशोत्सवासाठी एक वेगळी ओळख आहे. हा उत्सव बघण्यासाठी लाखो लोक बाहेरून येतात. या उत्सवाला मोठा इतिहास आणि अनेकांचे बलिदान लाभले आहे. त्यामुळे गालबोट लागेल असे कोणतेही वर्तन मंडळांनी करू नये आणि सर्व नियमांचे पालन करत पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करावा,” अशी अपेक्षा रोहित टिळक यांनी व्यक्त केली. हेही वाचा… मुस्लिम बांधवांनी गरब्यात सहभागी होण्यात काहीही गैर नाही!: अमृता फडणवीसांची परखड भूमिका; शांततेने उत्सवाचा आनंद घ्यायला हरकत नाही! गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गरब्यात मुस्लिमांना प्रवेश द्यायचा की नाही, यावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापू लागले आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याची मागणी होत असतानाच मंत्री नितेश राणे यांनीही ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा उपस्थित करत मुस्लिम तरुणांना गरब्यात प्रवेश देऊ नये, अशी भूमिका मांडली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *