![]()
हातात शाडू माती, मनात बाप्पाची सुंदर प्रतिमा आणि ती प्रत्यक्षात साकारण्याचा उत्साह… अशा आनंदी वातावरणात भारती फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘आम्ही देऊ माती, तुम्ही बनवा गणपती’ या अनोख्या गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेला चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वतःच्या हातांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविण्याचा आनंद मुलांनी यावेळी अनुभवला. सातारा शहरातील छत्रपती शाहू उद्यान, गुरुवार बाग येथे सकाळी आठ ते दहा या वेळेत ही कार्यशाळा घेण्यात आली. पाच ते 15 वर्षे वयोगटातील मुला-मुलींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत शाडू मातीला आपल्या कल्पकतेनुसार आकार दिला. मातीचा गोळा हळूहळू गणरायाच्या मूर्तीत रूपांतरित होत असताना मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्सुकता विशेष लक्षवेधी ठरली. भारती फाउंडेशनचे प्रमुख रविंद्र भारती यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचे यंदा चौथे वर्ष आहे. टीम कलाकारीच्या माध्यमातून आयोजित या कार्यशाळेत मूर्तिकार महेश लोहार आणि शिल्पकार मंदार लोहार यांनी मुलांना गणेशमूर्ती निर्मितीचे प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले. माती मळण्यापासून मूर्तीला आकार देणे, शरीराचे विविध अवयव तयार करणे तसेच मूर्तीला सुबक रूप देण्यापर्यंतच्या विविध टप्प्यांची माहिती मुलांना प्रत्यक्ष कृतीतून देण्यात आली. कार्यशाळेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला गणेशमूर्ती तयार करण्यासाठी शाडू माती आणि बेस बोर्ड देण्यात आला. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला. ‘गणपती विकत घेण्यापेक्षा स्वतःच्या हाताने घडवावा’ आणि त्यातून मुलांमध्ये सर्जनशीलता, कलागुण तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जाणीव निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे ही कार्यशाळा केवळ मूर्ती बनविण्यापुरती मर्यादित न राहता मुलांसाठी कला, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा आनंददायी अनुभव ठरली.
Source link
चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला गणराया:साताऱ्यातील भारती फाउंडेशनच्या ‘आम्ही देऊ माती, तुम्ही बनवा गणपती’ कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद