पावसाने दडी मारल्यामुळे राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, ‘क्रांतिकारी शेतकरी संघटने’चे नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसक
.
पत्रकार परिषदेत सरकारवर घणाघात
आंदोलनापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत रविकांत तुपकर यांनी सरकारला खडे बोल सुनावले. “पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीन, कपाशी आणि मूग ही पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. एका बाजूला सरकार मारतय आणि दुसऱ्या बाजूला निसर्ग मारतोय, अशी विदर्भातली परिस्थिती आहे. छत्रपती शिवरायांच्या काळात दुष्काळ पडला तेव्हा त्यांनी अन्नधान्याची कोठारे खुली करून शेतकऱ्यांना जगवले. मात्र, त्यांचे नाव घेऊन चालणारे हे ‘महायुती’ सरकार शेतकऱ्यांना एक रुपयाचीही मदत करायला तयार नाही,” अशी बोचरी टीका त्यांनी केली.

रविकांत तुपकर यांच्या प्रमुख मागण्या
- नुकसान भरपाई: सरकारने तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि खरीप पिकांसाठी प्रति हेक्टर १ लाख रुपये मदत द्यावी.
- सरसकट कर्जमाफी: २०१९ पूर्वीच्या व कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. नियमित कर्जदारांना २ लाख रुपयांचे अनुदान द्यावे. सिबिल खराब होणार नाही, याची हमी द्यावी.
- २४ तास वीज: जळालेले ट्रान्सफॉर्मर लवकर बदलून मिळत नाहीत आणि लोडशेडिंगचा मोठा त्रास आहे. “पुणे-मुंबईत लोडशेडिंग नाही कारण तिथे माणसे राहतात आणि गावात शेतकरी राहतो म्हणून तो जनावराच्या भूमिकेत आहे का?” असा सवाल करत शेतकऱ्यांना २४ तास वीज देण्याची मागणी त्यांनी केली.
- बोगस बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई: बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांकडून कृषी आयुक्तालय हप्ते घेत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करून संबंधितांवर थेट जन्मठेपेची शिक्षा करणारा कायदा आणावा.
- कृषी आकृतीबंधाला विरोध: कृषी विभागाचा नवीन आकृतीबंध विदर्भ आणि मराठवाड्यावर मोठा अन्याय करणारा आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत येथे फील्डवर काम करणारे कृषी कर्मचारी कमी करण्यात आले आहेत. हा आकृतीबंध तातडीने बदलण्यात यावा. कृषी कर्मचाऱ्यांच्या आणि एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनालाही त्यांनी आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला.
शेतकऱ्यांची ताकद दाखवून देऊ
“सत्ताधारी लोक मोठ्या रॅली आणि कार्यक्रम करतात तेव्हा त्यांच्यावर कारवाई होत नाही, पण शेतकरी रस्त्यावर आला की त्याला जेलमध्ये टाकले जाते. इंग्रजांपेक्षाही हे सरकार भयानक वागत आहे. जर आमच्या बापाचा घाम तुम्ही पायाखाली तुडवाल, तर तुमच्या राजकीय गढ्या उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही,” असा सणसणीत इशारा तुपकर यांनी दिला. पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आंदोलन उभारणार असल्याचे ते म्हणाले.
साखर आणि ऊस दरावरही भाष्य
साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण करून विशिष्ट व्यापाऱ्यांचा फायदा करून दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “कारखानदारांनी उसाचा हंगाम वेळेवरच सुरू करावा जेणेकरून रिकव्हरी चांगली मिळेल आणि ऊस उत्पादकांना किमान ५,००० रुपये प्रति टन दर मिळावा,” अशी मागणीही त्यांनी केली. शेतकरी प्रश्नांवर बच्चू कडू यांना सोबत घेणार का? या प्रश्नावर उत्तर देताना तुपकर म्हणाले, “बच्चू भाऊ आता सत्तेत आहेत, त्यामुळे त्यांना आंदोलनात सहभागी होण्यावर काही मर्यादा आहेत.” अमरावती येथून सुरू झालेले हे डेरा आंदोलन आता संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात पसरणार असून, आगामी काळात सरकारला शेतकऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा…
मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, धनंजय मुंडेंचे फडणवीसांना पत्र: छत्रपती संभाजीनगरात विशेष मंत्रिमंडळ बैठकीची मागणी; अंबादास दानवेंची टीका

पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाड्यातील खरीप हंगाम संकटात सापडला असून, आता या परिस्थितीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. मराठवाड्यात निर्माण झालेली परिस्थिती कोरड्या दुष्काळासारखी असल्याचे सांगत मुंडे यांनी मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि छत्रपती संभाजीनगर येथे विशेष मंत्रिमंडळ बैठक घ्यावी, अशी मागणी केली आहे. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी