Headlines

तरुणाच्या खून प्रकरणी एकाला अटक:काळेपडळ पोलिसांनी केली कारवाई; खुनाचे कारण अस्पष्ट




हांडेवाडी परिसरात झालेल्या एका तरुणाच्या खून प्रकरणाचा छडा काळेपडळ पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणी खून करून पसार झालेल्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आकाश मारुती झांबरे (वय ३१, रा. झांबरे तालीम चौक, होळकरवाडी, ता. हवेली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आकाश उर्फ आत्या अशोक भरेकर (वय ३१, रा. झांबरे तालीम चौक, होळकरवाडी, ता. हवेली) याला अटक करण्यात आली आहे. मृत झांबरे यांचा चुलतभाऊ रवींद्र जालिंदर झांबरे यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-हडपसर बाह्यवळण मार्गावरील हांडेवाडी भागातील एका सोसायटीजवळच्या मोकळ्या जागेत एक तरुण मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गौहर हसन, परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे, राजेंद्र मुळीक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हे शाखा आणि काळेपडळ पोलीस ठाण्यातील पथकांनी तात्काळ तपास सुरू केला. तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी संशयावरून आकाश उर्फ आत्या अशोक भरेकर याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान भरेकर याने झांबरे याचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. खुनामागचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. आरोपी भरेकर याची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. आरोपीचे इतर कोणी साथीदार आहे का याबाबत देखील पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विलास सुतार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *