Headlines

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा:विद्यानिकेतनचे 9 खेळाडू, चांडक विद्यालयाचे 4 संघ जिल्हास्तरावर, दोघांची राज्यस्तरीय कबड्डी संघात निवड‎




महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यानिकेतन व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय, कुऱ्हा आणि रामप्यारीबाई चांडक विद्यालय, मोर्शी येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. या स्पर्धांमध्ये विद्यानिकेतनच्या ९ खेळाडूंची मैदानी स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर निवड झाली आहे. चांडक विद्यालयाचे कबड्डी व व्हॉलिबॉलचे चार संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. चांडक विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी जिल्ह्याच्या संघात निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या चमकदार यशामुळे दोन्ही शाळांच्या प्रांगणात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक व सर्व शिक्षकवृंदांनी यशस्वी खेळाडूंचे कौतुक केले. त्यांनी पुढील जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. खेळाडूंच्या या यशामागे त्यांचे कठोर परिश्रम महत्त्वाचे ठरले. क्रीडा शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शनही तितकेच महत्त्वाचे ठरले. विद्यानिकेतनचे ९ खेळाडू जिल्हास्तरावर कुऱ्हा येथील विद्यानिकेतन व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंनी तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. विविध धावण्याच्या प्रकारांत यश मिळवत ४ मुली व ५ मुलांसह एकूण ९ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. १४ वर्षांखालील मुलांमध्ये सर्वेश किंदरले याने २०० व ४०० मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक मिळवला. १७ वर्षांखालील मुलांमध्ये उज्ज्वल गडलिंग याने ६०० मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक पटकावला. १९ वर्षांखालील मुलांमध्ये कृष्णनाथ योगी याने १५०० मीटर, ३००० मीटर धावणे व क्रॉस कंट्रीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. मंथन साठवणे याने ३००० मीटरमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. मोहित चांबटकर याने ८०० मीटरमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. त्याने २०० मीटरमध्ये द्वितीय, तर ४०० मीटरमध्ये तृतीय क्रमांक मिळवला. १७ वर्षांखालील मुलींमध्ये वैष्णवी राजेश इखार हिने ४०० व १५०० मीटरमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. साक्षी रवींद्र देशमुख हिने ८०० मीटरमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. तिने १०० व २०० मीटरमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. राधिका इंगोले हिने ३००० मीटर चालण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. १९ वर्षांखालील मुलींमध्ये जान्हवी मेश्राम हिने ४०० मीटरमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल प्रकाशदादा मक्रमपूरे, शाळा समिती सदस्य सुरेंद्र सोहळे, मुख्याध्यापक दिनेश सवाई यांच्यासह खेळाडूंचे अभिनंदन केले. चांडक विद्यालयाचे चार संघ जिल्हास्तरावर मोर्शी येथील रामप्यारीबाई चांडक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली. कबड्डी स्पर्धेचे आयोजन चांडक विद्यालयात करण्यात आले. व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन जनता शिक्षण संस्थेच्या प्रांगणात शे.घाट येथे करण्यात आले. या स्पर्धांमध्ये तालुक्यातील विविध शाळांमधील मुला-मुलींच्या संघांनी सहभाग घेतला. चांडक विद्यालयाच्या १४ व १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या कबड्डी संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. १४ व १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या व्हॉलिबॉल संघांचीही निवड झाली. त्यामुळे विद्यालयाचे चार संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी जिल्ह्याच्या संघात चांडक विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. १४ वर्षे वयोगटातून इयत्ता आठवीतील आदित्य नीलेश सातपुते याची निवड झाली. १७ वर्षे वयोगटातून इयत्ता दहावीतील अभय राईकवार याची निवड झाली. या यशाबद्दल विद्यार्थ्यांनी क्रीडा शिक्षक एस. एस. बोहरपी, पी. एम. बानाईत, एस. बी. क्षीरसागर यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणाबद्दल आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *