Headlines

तिवस्यात उपवर्गीकरणाच्या विरोधात आंदोलकांचा एल्गार:सरकारचा तीव्र निषेध, प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणला‎




अनुसूचित जाती (एससी) या संवर्गात समाविष्ट असलेल्या ५९ जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात आज, मंगळवार, ३० जून रोजी तिवसा येथे एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक महिला-पुरुष रस्त्यावर उतरून सहभागी झाले. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चाचा प्रारंभ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून करण्यात आला. आंदोलनाच्या अंतिम टप्प्यात सदर मागणीचे निवेदन राष्ट्रपती यांना तिवसा तहसीलदार यांच्या मार्फत पाठविण्यात आले. जिल्हा स्तरावर गठित उपवर्गीकरणविरोधी कृती समितीने या आंदोलनाचे नेतृत्व केले. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून केंद्र व राज्यातील महायुती सरकारने जाती-जातींत भांडणे लावण्याचे राजकारण सुरू केले आहे. अनुसूचित जाती या संवर्गातील ५९ जातींना हक्काचे १३ टक्के आरक्षण आहे. परंतु उपवर्गीकरणाच्या नावाखाली ते संपवण्याचा कट सरकारने आखला आहे. हे उपवर्गीकरण कुठल्याही परिस्थितीत हाणून पाडण्याचा या आंदोलनाचा उद्देश आहे. यावेळी सरकारच्या धोरणाविरोधात समाजबांधव अत्यंत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलनात नगरसेवक अनिल थूल, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे, संदीप चक्रनारायण, सागर भवते, नगरसेवक आशीष ढोले, जानराव मनोहर, राजेंद्र शेंडे, भारत दाहाट, दिलीपराव जवंजाळ, शरद वानखडे, देवदत्त खोंडे, संदीप दाहाट, पुरुषोत्तम मेश्राम, संदीप हगवणे, धम्मराज खडसे, नितीन थोरात, सचिन जोगे, अमोल जवंजाळ, प्रकाश सोनोने, प्रशिक मकेश्वर, प्रकाश चिंचखेडे, यश ठाकरे, रामभाऊ मनोहर आदी सहभागी झाले होते. चिमुकल्यांच्या हस्ते निवेदन अमरावती जिल्ह्यासह राज्यात उपवर्गीकरणाविरोधात पहिल्यांदाच तालुकास्तरीय एल्गार मोर्चा तिवसा तालुक्यात काढण्यात आला. या एल्गार मोर्चात महापुरुषांची वेशभूषा करून काही चिमुकले सहभागी झाले होते. याच चिमुकल्यांच्या हस्ते तहसीलदार डॉ. मयूर कळसे यांच्यामार्फत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *