Headlines

तिसऱ्या श्रावणी शनिवारी सहा लाख भाविकांनी घेतले भद्रा मारुतीचे दर्शन:पहाटे 4 वाजता महाभिषेक, 30 तास चालले दर्शन‎




येथील भद्रा मारुती मंदिरात श्रावणातील तिसऱ्या शनिवारी पहाटेपासूनच दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. संभाजीनगर जिल्ह्यासह राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या ६ लाखांहून अधिक भाविकांनी ३० तासांच्या अखंड कालावधीत भद्रा मारुतीचे दर्शन घेतल्याचे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे यांनी सांगितले. भद्रा मारुती मंदिरातील श्रींच्या मूर्तीची पपई, टरबूज, लिंबू, डाळिंब आणि मोसंबी अशा पाच प्रकारच्या ताज्या फळांसह विविध रंगीबेरंगी फुलांचा सुरेख वापर करून सजावट करण्यात आली होती. बाळू खाडे व त्यांच्या मित्रपरिवाराने तीन तास अथक परिश्रम घेऊन मूर्तीच्या शीर्षापासून चरणकमलांपर्यंत ही विलोभनीय सजावट साकारली. फळे आणि फुलांनी सजवलेले भद्रा मारुतीचे हे मनोहारी रूप डोळ्यांत साठवण्यासाठी भाविकांनी विशेष गर्दी केली होती. मागील शनिवारी ५ लाख भाविक होते, तर तिसऱ्या शनिवारी ६ लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दरम्यान, मोठ्या रांगा असल्याने दर्शनासाठी एक तासाचा वेळ लागला आहे. शनिवारी पहाटे ४ वाजता महाअभिषेक, शंखनाद आणि आरती करून धार्मिक विधींना सुरुवात झाली. याप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ, रामनाथ बारगळ, आबासाहेब बारगळ, कैलास बारगळ, राजेंद्र बारगळ, संजय देवकर, फुलारे पाटील उपस्थित होते. तिसऱ्या श्रावणी शनिवारचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता शुक्रवारी रात्रीपासूनच छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरातील विविध भागांतून हजारो भाविक पायी खुलताबादच्या दिशेने रवाना झाले होते. अनेक ठिकाणांहून पालखी मिरवणुकाही काढण्यात आल्या. श्रावणी तिसऱ्या शनिवारनिमित्त मंदिर परिसरात विविध दानशूर व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने भव्य भंडाऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तब्बल १५ क्विंटल खिचडीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *