![]()
गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथील गट क्रमांक ८६ परिसरात समृद्धी महामार्गालगत पीएनजीचे पॉइंट कपलिंग फुटल्याने शनिवारी सायंकाळी गॅसची गळती झाली. सायंकाळी ५.१७ वाजण्याच्या सुमारास अचानक मोठा आवाज होऊन गॅसचा फवारा उंच उडताना दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने २०० फूट परिसराची नाकेबंदी केली. तसेच समृद्धी महामार्गावरील वाहतूक ३० मिनिटे थांबवण्यात आली होती. पोटुळ स्टेशन रोडवरील समृद्धी महामार्गाच्या पुलाखालून ही पाइपलाइन जात असल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन टाकळीवाडीचे पोलिस पाटील उदलसिंग जारवाल यांनी भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना माहिती दिली. चव्हाण यांनी वरिष्ठ पातळीवर तसेच दौलताबाद पोलिस व गंगापूरचे तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्याशी संपर्क साधून तातडीने मदत पथके रवाना करण्यास सांगितले. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब, शिल्लेगाव आणि दौलताबाद पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ‘गेल इंडिया’च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर गॅस पाइपलाइनचा मागील व पुढील दोन्ही स्टेशनवरून पुरवठा तात्काळ बंद करण्यात आला. पाइपलाइनमध्ये आधीपासून असलेला उर्वरित गॅस पूर्णपणे बाहेर पडून दाब कमी होईपर्यंत गळती सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गॅस गळती नियंत्रणात आणण्यासाठी तज्ज्ञ दुरुस्ती पथक व मेकॅनिक घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर काम सुरू आहे. उरणहून नागपूरकडे जाणारी ६९४ किमीची पाइपलाइन गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथे समृद्धी महामार्गालगत उरणहून नागपूरकडे जाणाऱ्या गेल इंडिया कंपनीच्या ६९४ किमी लांबीच्या मुख्य पीएनजीला गळती लागली. पॉइंट कपलिंग फुटल्याने झालेल्या मोठ्या आवाजाने परिसरात घबराट पसरली. सुरक्षेसाठी पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करत समृद्धीवरील वाहतूक रोखली.
Source link
समृद्धीजवळ गॅस गळती; अर्धा तास वाहतूक रोखली:टाकळीवाडीत घटना; अग्निशमन दल घटनास्थळी