![]()
गर्भलिंगनिदान प्रकरणातील संशयित डॉक्टर दांपत्याला अटक न करण्यासाठी थेट अकलूजचे पोलिस उपअधीक्षक आणि पोलिस शिपायाच्या नावाने तब्बल साडेपाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना २ दलालांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे पथकाने शुक्रवारी दुपारी रंगेहाथ पकडले.
.
आबा वळकुंदे व महादेव माने अशी अटक झालेल्या दलालांची नावे आहेत. पोलिस उपअधीक्षक संतोष वाळके यांच्यासाठी ५ लाख व पोलिस शिपाई राहुल वाघ यांच्यासाठी ५० हजारांची डील झाली होती. याप्रकरणी लाच स्वीकारणाऱ्या २ दलालांसह पोलिस हवालदार अनिल शिंदे व राहुल वाघ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. उपअधीक्षक वाळके यांच्या संदर्भात चौकशीनंतर निर्णय होणार आहे.
२५ लाखांची होती मागणी, पुणे एसीबीकडे तक्रार
अकलूज पोलिसांनी १८ ऑगस्टला डमी रुग्ण पाठवून गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश केला होता. यातील आरोपींवर कारवाई न करण्यासाठी २५ लाखांच्या लाचेची मागणी झाल्याची तक्रार २१ ऑगस्ट रोजी पुणे एसीबीकडे आली. तपासात शिंदे याने आधीच १० लाख रुपये स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. शुक्रवारी उर्वरित रक्कम मागितली होती.