![]()
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यावर अत्यंत खोचक शब्दांत टीका केली आहे. तुतारीच्या वाजंत्रीच्या बुद्धीचा खडखडाट झालेला दिसतोय. तुमचे पिताश्री पक्ष रोडून राष्ट्रवादीत गेले, तेव्हा कुणी कसला तुकडा टाकला होता का? असे त्या म्हणाल्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विरोधकांवर महिला आरक्षणाच्या मुद्यावर चर्चेचे आव्हान दिले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे आव्हान स्वीकारले होते. पण चित्रा वाघ यांनी फडणवीस हे त्यांच्या बरोबरीच्यांशी बोलतील असे म्हणत त्यांचे आव्हान टोलवून लावले होते. त्यानंतर रोहिणी खडसे यांनी सुप्रिया सुळे यांनी आव्हान स्वीकारल्यामु्ळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याची टीका केली होती. तसेच चित्रा वाघ यांचा उल्लेख त्यांनी चित्रा-विचित्र असाही केला होता. यामुळे संतापलेल्या चित्रा वाघ यांनी आज एका पोस्टद्वारे त्यांच्यावर पलटवार केला. छू म्हटलं तर भुंकायचं ही भाजपची शैली नाही
चित्रा वाघ आपल्या पोस्टमध्ये रोहिणी खडसेंना उद्देशून म्हणाल्या, तुतारीची वाजंत्री तिच्या बुद्धीचा खडखडाट झालेला दिसतोय. तुमचे पिताश्री पक्ष सोडून राष्ट्रवादीत गेले तेव्हा कोणी कसला तुकडा टाकला होता का? आणि हो छू म्हटलं तर भुंकायचं ही भाजपची शैली नाही … तुम्हाला मात्र तुमच्या मालकिणीला काही बोललं की मिरची झोंबते. आम्ही आजही नारीशक्ती वंदन विधेयकासाठी लढतोय… महिलांना हक्क देण्यासाठी मैदानात उतरला असता तर कौतुक वाटलं असतं… पण परंपरेतून मिळालेल्या खुर्चीत आरामशीर बसून भुंकणं सोपं आहे.. बाकी ही खूप बोलता येईल, पण तुर्तास एव्हढचं.
आत्ता पाहू काय म्हणाल्या होत्या रोहिणी खडसे? रोहिणी खडसे आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या होत्या, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी खुलं आवाहन काय स्वीकारलं तर लोकांच्या पायाखालची जमीनच सरकलेली दिसतीये ! चर्चेला येण्याची हिम्मत नाही, आपण एक्सपोज होऊ म्हणून ‘चित्रा’विचित्र माणासांना छू… म्हटलंय. बरं या ‘चित्रा’विचित्र माणसांची जागा काय? तर आधी यांनी आदरणीय शरद पवार साहेबांना बाप म्हणून, आदरणीय सुप्रिया सुळे ताईंना मोठी बहीण म्हणून पदे मिळवली, स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली आणि आमदारकीचा तुकडा काय टाकला की पक्ष सोडून गेले. तिकडे गेल्यावर देखील पवार साहेब, सुप्रियाताई यांच्यावर टीका केल्यावरच यांचे घर चालते! अशा लोकांनी तरी सुप्रियाताई सुळेंवर बोलू नये, असे त्या म्हणाल्या होत्या.
सदाभाऊ खोतांवरही साधला निशाणा उल्लेखनीय बाब म्हणजे रोहिणी खडसे यांनी पवार कुटुंब केव्हाच पुरोगामी नव्हते असा दावा करणाऱ्या सदाभाऊ खोतांवरही निशाणा साधला होता. त्या म्हणाल्या होत्या, अहो सदाभाऊ… तुम्ही ज्या पवार कुटुंबीयांवर बोलताय त्या कुटुंबाचा भाग आदरणीय अजितदादा पण आहेत, ज्यांचा प्रचार तुम्ही आणि तुमचे सवंगडी करत आहेत त्या सुनेत्रा वहिनी सुद्धा त्याच कुटुंबाचा भाग आहे. कसंय ना, माणसाने झेपेल तितकंच बोलायला हवे ! तुमचा आणि पुरोगामी विचारांचा संबंध येतो का ? आदरणीय शरद पवार साहेबांच्या मातोश्री ब्रिटिश राजवटीत पुणे लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या. आदरणीय शरद पवार साहेबांचे वडील हे सत्यशोधक चळवळीत काम करायचे तसेच शिक्षणाची गंगा बहुजनांच्या प्रत्येक घरात पोहोचावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आयुष्यभर कष्ट घेतले त्यात आदरणीय शरद पवार साहेबांच्या वडिलांनी त्यांना मोलाची साथ दिली. इतकंच काय जिथं प्रतिगामी लोक वंशाचा दिवा पाहिजे म्हणून मुलगा व्हावा याचा अट्टाहास करतात तिथे पवार साहेबांनी मुलीच्या जन्माचे स्वागत केले. हे विचार तुम्हाला झेपण्या पलिकडचे आहेत, त्यामुळे फार बाता मारून नका, असे त्या म्हणाल्या होत्या.
Source link