![]()
म्यानमार आणि थायलंडच्या सीमेवर ‘सायबर गुलामगिरी’च्या भयंकर विळख्यात अडकलेल्या शेकडो भारतीय तरुणांच्या सुटकेसाठी परराष्ट्र मंत्रालयाने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. थायलंड आणि म्यानमारमधील स्थानिक सुरक्षा यंत्रणांना सोबत घेऊन ही आंतरराष्ट्रीय बचाव मोहीम राबवली जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील बीड, जळगाव, नाशिक, सातारा जिल्ह्यांतील तरुणांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे यासंदर्भात पाठपुरावा केला होता. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने या मोहिमेला गती दिली असून, बँकॉक येथील भारतीय दूतावासाने चव्हाण यांना पत्राद्वारे या कारवाईची अधिकृत माहिती दिली आहे. या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वैयक्तिकरीत्या बारीक लक्ष ठेवून आहेत. लवकरच या तरुणांची सुटका करण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे. फेसबुकवरील ‘ती’ जाहिरात ठरली जीवघेणा सापळा! सोशल मीडियावरील आकर्षक जाहिराती कशा घातक ठरू शकतात, याचा प्रत्यय म्यानमार सीमेवर आला आहे. फेसबुकवर ‘बँकॉक येथे डेटा एन्ट्रीचे काम आणि ७० हजार रुपये पगार’ अशी जाहिरात पाहून नाशिक व बीडसह महाराष्ट्रातील अनेक तरुण थायलंडला गेले. मात्र, तिथे त्यांचे पासपोर्ट जप्त करून बंदुकीचा धाक दाखवत अज्ञात ठिकाणी डांबले. तेथे महाराष्ट्रातील २०-२५ तरुणांसह ८०० भारतीय नागरिक ओलीस आहेत. याप्रकरणी बीड सायबर पोलिसांत गुन्हा दाखल आहे.
Source link
थायलंडच्या ‘सायबर गुलामगिरी’तून भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्राची मोहीम:खा. अशोक चव्हाणांच्या पत्राची दखल; बीडच्या तरुणांचा समावेश