![]()
स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका आणि जिल्हा परिषदेनंतर आता भारतीय जनता पक्षाने आपला मोर्चा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे वळवला आहे. जिल्हा बँक महायुतीच्या ताब्यात यावी म्हणून भाजपने नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांना प्रचारासाठी लावले आहे. येत्या ४ जुलै रोजी जिल्हा बँकेसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर ५ जुलै रोजी मतमोजणी होईल. भाजप विभागीय कार्यालयात या निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या नगरसेवकांची बैठक झाली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मताचे अचूक नियोजन करण्यासाठी जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी नगरसेवकांना मैदानात उतरवले आहे. मतदार कुठे राहतो, त्याच्याशी संपर्क कसा साधायचा आणि प्रत्यक्ष मतदान कसे करून घ्यायचे, याचे नियोजन आणि पुढील व्यूहरचनेबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक एकत्र येऊन लढण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते, विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये नाहीत. त्यांचा महायुतीच्या पॅनलमध्ये समावेश आहे. त्यामुळे ही निवडणूक चर्चेत आहे. ५ जागांवर लढणार, तरीही पॅनलची दोरी भाजपच्या हाती जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने ६० नगरसेवक आणि २७ जिल्हा परिषद सदस्यांना थेट मैदानात कामी लावले आहे. या निवडणुकीत महायुतीचे पॅनल आहे. शिंदेसेनेचे जिल्ह्यात सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे सर्वाधिक ९ जागा शिवसेना लढवत आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी ५ जागा लढवत आहेत. त्यामुळे बँकेवर भाजपची एकहाती सत्ता येणे शक्य नाही, तरीही जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे महायुतीमधील पक्षाकडे राहावीत म्हणून भाजपने या निवडणुकीत शक्ती पणाला लावल्याचे मानले जाते. संघटनेच्या बळावर विजय संघटनेचे बळ आणि कार्यकर्त्यांची एकजूट यांच्या जोरावर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा फडकेल. – किशोर शितोळे, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप, छत्रपती संभाजीनगर
Source link
भाजप नगरसेवक, जि.प. सदस्यांना बँकेच्या निवडणुकीची जबाबदारी:जिल्हा बँक महायुतीच्या ताब्यात घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न