![]()
भागवत कथा ही पूर्वपुण्याईशिवाय ऐकायला मिळत नाही. जगात कसे जगावे हे आपल्याला ‘भगवद्गीता’ शिकवते, तर कसे मरावे हे ‘भागवत’ शिकवते. या कथेमुळे जन्म-मरणाचे साकडे सुटते. त्यामुळे सर्व भाविकांनी या पर्वकाळात कथेचे श्रवण करून आंतरिक आनंद मिळवावा, असे श्रीक्षेत्र देवगड दत्त पीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी भाविकांना मार्गदर्शन करताना सांगितले. त्रैवार्षिक पुरुषोत्तम मासाच्या पवित्र पर्वावर, नेवासे तालुक्यातील ‘भूलोकीचा स्वर्ग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गुरुदेव दत्तपीठ क्षेत्र देवगड येथे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाचा सोहळा सुरू झाला आहे. राजस्थान (जोधपूर) येथील संत गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून होणाऱ्या या कथा सोहळ्याचा प्रारंभ गुरुवारी भागवत ग्रंथ शोभायात्रा आणि गोमाता पूजनाने करण्यात आला. यावेळी टाळ-मृदंगाचा गजर आणि भगवान दत्तात्रयांच्या नामघोषाने संपूर्ण देवगडनगरी दुमदुमून गेली होती. पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित या विशेष श्रीमद भागवत कथा व कीर्तन सोहळ्याला “विठ्ठल भक्तीरस महोत्सव” असे नाव देण्यात आले आहे. देवगड येथील मुख्य प्रांगणातून वारकरी संप्रदायाच्या पारंपारिक थाटात शोभायात्रेला सुरुवात झाली. या मिरवणुकीत गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज, देवगड दत्त पीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज, आणि त्यांचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्यासह वारकरी संप्रदायातील अनेक संत-महंत, कीर्तनकार, प्रवचनकार आणि हजारो महिला-पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शोभायात्रा सुरू असतानाच, देवगडच्या गोशाळेत जाऊन गोमातेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पवित्र प्रवरा-गंगा पात्रात जाऊन मान्यवर संतांच्या हस्ते गंगेचे विधीवत पूजन पार पडले. याप्रसंगी भगवान दत्तात्रय आणि श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या समाधी मंदिरात जाऊन मूर्तींचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ‘ज्ञानसागर’ सभामंडपात या भव्य शोभायात्रेचा समारोप झाला. येथे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते भागवत ग्रंथाचे आणि श्री राधाकृष्णजी महाराज यांचे संतपूजन करण्यात आले. भास्करगिरीजी महाराज म्हणाले, पुरुषोत्तम मासाच्या या पवित्र काळात श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा आणि भगवान दत्तात्रयांच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला पुन्हा एकदा गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या वाणीतून भागवत श्रवणाची सुवर्णसंधी मिळाली आहे. ‘राधा’ हे भक्तीचे तर कृष्ण हे ज्ञानाचे प्रतीक आहे. पुरातन काळातील कुटीया ठरतेय मुख्य आकर्षण कथेच्या शुभारंभ प्रसंगी व्यासपीठाची केलेली सजावट वैशिष्ट्यपूर्ण आहे. शेणाने सारवलेले मॅट, त्यावर काढलेल्या आकर्षक रांगोळ्या, पुरातन काळातील कंदील, तांबे-पितळाचे हंडे आणि चटईची कुटीया या पारंपरिक पद्धतीने मुख्य कथा व्यासपीठ सजवण्यात आले आहे. तसेच कथेच्या पार्श्वभूमीवर पंढरीच्या पांडुरंगाने संतांना खांद्यावर घेतल्याची प्रतिमा लक्ष वेधून घेत आहे.
Source link
दत्तात्रयांच्या जयघोषाने देवगडनगरी दुमदुमली:जगात कसे जगावे हे भगवद्गीता, तर कसे मरावे हे भागवत शिकवते, भास्करगिरीजी महाराज यांचे प्रतिपादन