![]()
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांची अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. दादर रेल्वे स्थानकाचे नाव ‘चैत्यभूमी’ करण्यास राज्य सरकारने यापूर्वीच तत्त्वतः मान्यता दिली असून, आता यासंदर्भातील आवश्यक प्रक्रिया विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर नामांतराची पुढील कार्यवाही केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे यापूर्वीच पत्रव्यवहार केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी आणि परिसरातील व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या अनुयायांसाठी आवश्यक सुविधा, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा विषयही उपस्थित झाला. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी नामांतरासंदर्भातील प्रक्रिया अधिवेशनात पूर्ण करण्याचे स्पष्ट केले. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, नगरविकास विभागाचे अधिकारी, विविध प्रशासकीय विभागांचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी, रेल्वे प्रशासन, मुंबई महापालिका आणि संबंधित संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महापरिनिर्वाण दिनासाठी प्रशासनाला विशेष सूचना दरवर्षी 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी मुंबईत येतात. दरवर्षी वाढणारी गर्दी लक्षात घेता यंदा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या. मागील वर्षीच्या आयोजनादरम्यान आढळलेल्या त्रुटींचा अभ्यास करून यंदा त्यांची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महापरिनिर्वाण दिनाचे आयोजन केवळ प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून न करता समन्वय समिती, बौद्ध संघटना आणि विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने करणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मुंबई महापालिका, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि अन्य विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या निश्चित करून परस्पर समन्वयाने काम करावे. अनुयायांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी उपलब्ध सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. चैत्यभूमी परिसरात आंदोलनांना बंदी घालण्याचे निर्देश महापरिनिर्वाण दिनाच्या वेळी चैत्यभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सुरक्षितता आणि शांतता राखण्यावर प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. या दिवशी अनुयायांना अभिवादनासाठी येताना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी चैत्यभूमी परिसरात धरणे, निदर्शने, मोर्चे किंवा अन्य प्रकारच्या आंदोलनांना अधिकृतपणे बंदी घालण्याबाबत गृह विभागाने आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले. चैत्यभूमी परिसरात शांततापूर्ण आणि श्रद्धापूर्ण वातावरण कायम राहणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाने गर्दीचे नियोजन, सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पुरेशी खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले. वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र नियोजन महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी दादर आणि चैत्यभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे यंदा वाहतुकीचे नियोजन आधीच करण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. परिसरात ऑटोरिक्षांच्या प्रवेशावर आवश्यक मर्यादा निश्चित करणे, अनुयायांना पुढील प्रवासासाठी पर्यायी सुविधा उपलब्ध करून देणे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे यावर भर देण्यात आला. रेल्वे प्रशासन, रस्ते वाहतूक विभाग, स्थानिक वाहतूक यंत्रणा आणि पोलीस यांनी एकत्रितपणे नियोजन करावे. बाहेरगावाहून येणाऱ्या अनुयायांना रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंत आणि त्यानंतर परतीचा प्रवास करताना अडचणी येऊ नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. महापरिनिर्वाण दिनी उत्सवी कार्यक्रम नकोत महापरिनिर्वाण दिनाचे गांभीर्य आणि पावित्र्य जपले गेले पाहिजे. हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा आणि त्यांच्या विचारांचे स्मरण करण्याचा आहे. त्यामुळे या दिवशी उत्सवी स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करणे टाळावे, असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले. उत्सवी कार्यक्रमांऐवजी अनुयायांना बाबासाहेबांच्या जीवनकार्याची आणि विचारांची माहिती मिळेल, असे उपक्रम राबविण्यावर भर देता येईल. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांचे प्रदर्शन किंवा त्यांच्या विचारांशी संबंधित अन्य उपक्रम आयोजित करता येतील का, याचा विचार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील आंबेडकरांच्या पुतळ्यांची स्वच्छता आणि सुशोभीकरण महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व पुतळ्यांची स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयाच्या अंमलबजावणीत काही ठिकाणी अडचणी येत आहेत का, याची तपासणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. ज्या ठिकाणी कामे अपूर्ण आहेत, तेथे संबंधित यंत्रणांनी लक्ष घालून पुढील पाच ते सात दिवसांत आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले. इंदू मिल स्मारकासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. या स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी मुख्य पुतळ्याच्या कामासह काही महत्त्वाच्या बाबी अद्याप प्रलंबित आहेत. कामाचा खर्च वाढला तरी त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. स्मारकाच्या उर्वरित कामासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. या कामाला गती देण्यासाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येणार असून, प्रलंबित विषयांचा आढावा घेऊन काम लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. एकूणच, दादर रेल्वे स्थानकाचे ‘चैत्यभूमी’ असे नामकरण करण्याच्या प्रक्रियेला आता गती मिळण्याची चिन्हे आहेत. विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या नामांतराच्या पुढील टप्प्याला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर महापरिनिर्वाण दिनाच्या आयोजनासाठी सुविधा, वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यावर राज्य सरकारने भर दिला आहे. हेही वाचा… सोनिया गांधींच्या पुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाचा दावा: शिंदे गटाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेतच फाडल्या सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या प्रती; उद्धव ठाकरेंवरही शरसंधान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) या पुस्तकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचा अत्यंत अवमानजनक उल्लेख करण्यात आल्याच्या निषेधार्थ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुधवारी मुंबईत आयोजित विशेष पत्रकार परिषदेत शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय निरुपम, शायना एन. सी. आणि महिला नेत्यांनी थेट कॅमेऱ्यांसमोर या पुस्तकाची आक्षेपार्ह पाने टराटरा फाडून तीव्र निषेध नोंदवला. “सावरकरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलेल्या उद्धव ठाकरेंना हा अपमान मान्य आहे का?” असा सणसणीत सवाल शिवसेना नेत्यांनी यावेळी उपस्थित केला. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
दादर रेल्वे स्थानकाचे नाव ‘चैत्यभूमी’ होणार:अधिवेशनात नामांतराची प्रक्रिया पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस