![]()
मुंबईच्या दादर परिसरात पूर्ववैमनस्यातून एका 40 वर्षीय तरुणाची त्याच्या पत्नीसमोरच बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या हल्ल्यात अंकुश आंबोरकर या तरुणाचा मृत्यू झाला असून, गौरव सणस आणि त्याच्या टोळक्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी दादर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, आतापर्यंत एकूण सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. रविवारी रात्री अंकुश आंबोरकर दादर येथे आपल्या एका मित्राला भेटण्यासाठी गेले असताना, संशयित आरोपी गौरव सणसने त्यांना रस्त्यात अडवले. या वेळी उभयतांमध्ये झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर हिंसक वळणात झाले आणि गौरवने आपल्या साथीदारांसह अंकुश यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, अंकुश यांची पत्नी प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असून, पतीला मारहाण होत असल्याची माहिती मिळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अंकुश यांना हल्लेखोरांच्या तावडीतून सोडवले. मारहाणीमुळे घटनास्थळी मोठी गर्दी जमू लागल्याने गौरव सणस आणि त्याचे टोळके तिथून पसार झाले. माहिती मिळताच दादर पोलिस काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अंकुश यांना उपचारासाठी तातडीने केईएम रुग्णालयात हलवले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी मृत अंकुश यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी गौरव सणस आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. अंकुश आंबोरकर आणि गौरव सणस यांच्यातील वादाची पाळेमुळे त्यांच्या जुन्या व्यावसायिक वैरात असून, पूर्वी एकत्र बँजो व्यवसाय करणाऱ्या या दोघांमध्ये 2017 मध्ये फूट पडल्यापासून तीव्र वितुष्ट निर्माण झाले होते. स्वतंत्र व्यवसाय सुरू केल्यामुळे सुरू झालेल्या या स्पर्धेतून गौरव अंकुशवर सातत्याने राग धरून होता आणि त्याला टोमणे मारण्यासह धमकावत असे, ज्याबाबत यापूर्वीही दादर पोलिस ठाण्यात मारहाणीची तक्रार नोंदवण्यात आली होती. मात्र, अनेक वर्षांपासून सुरू असलेले हे वैयक्तिक वैर अखेर हत्येपर्यंत पोहोचल्याने आता या संवेदनशील प्रकरणात पोलीस नेमकी काय कठोर कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Source link
दादर हादरले!:पत्नीसमोरच पतीची बेदम मारहाण करून हत्या; पूर्ववैमनस्यातून 6 जणांना बेड्या