Headlines

दिल्लीनंतर पुण्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’चा एल्गार:धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी करणार आंदोलन; 11 जूनला तरुणाई येणार रस्त्यावर




दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या चर्चित आंदोलनानंतर आता ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) महाराष्ट्रात आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी 11 जून रोजी पुण्यात मोठ्या आंदोलनाची घोषणा केली असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे. दिल्लीतील आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता पुणे हे या मोहिमेचे पुढील केंद्र बनले आहे. नेमके आंदोलन कशासाठी? कॉकरोच जनता पार्टीचा आरोप आहे की, देशातील स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक व्यवस्थेतील कथित अनियमिततेमुळे लाखो विद्यार्थी व युवक त्रस्त आहेत. विशेषतः नीट परीक्षा, सीबीएसई निकालांशी संबंधित वाद आणि विविध भरती प्रक्रियांतील कथित त्रुटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे. दिल्लीतील आंदोलनाने वेधले होते देशाचे लक्ष 6 जून रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने पहिले मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली होती. आंदोलनात शेकडो विद्यार्थी, युवक आणि पालक सहभागी झाले होते. अनेक आंदोलकांनी कॉकरोचचे मुखवटे घालून निषेध नोंदवला होता. आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने पार पडले आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली. ‘कॉकरोच जनता पार्टी’ची सुरुवात कशी झाली? गेल्या काही आठवड्यांत सोशल मीडियावर वेगाने लोकप्रिय झालेल्या या चळवळीची सुरुवात व्यंगात्मक स्वरूपात झाली होती. काही वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ची संकल्पना पुढे आणली. बेरोजगारी, शिक्षणातील समस्या आणि युवकांच्या वाढत्या असंतोषाला आवाज देण्याचा प्रयत्न म्हणून ही चळवळ उभी राहिल्याचा दावा केला जातो. अल्पावधीतच या मोहिमेला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला. पुण्यातील आंदोलनाचे ठिकाण कोणते? अभिजीत दिपके यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, 11 जून रोजी पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात आंदोलन करण्यात येणार आहे. दिल्लीतील आंदोलनानंतर महाराष्ट्रातील हे पहिले मोठे शक्तिप्रदर्शन मानले जात आहे. विद्यार्थी संघटना आणि युवकांचा सहभाग वाढवण्यावर आयोजकांचा भर असल्याचे सांगितले जात आहे. राजकीय वर्तुळाचेही लक्ष सुरुवातीला सोशल मीडियापुरती मर्यादित वाटणारी ही चळवळ आता राष्ट्रीय चर्चेचा विषय बनली आहे. दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीतही या चळवळीचा उल्लेख झाल्याची चर्चा होती. युवकांमधील नाराजीचे प्रतीक म्हणून कॉकरोच जनता पार्टीकडे पाहिले जात असल्याचे काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे. कॉकरोच जनता पार्टी हा औपचारिक राजकीय पक्ष नसला तरी त्याच्या आंदोलनांनी युवकांमध्ये निर्माण केलेली उत्सुकता राजकीय पक्षांसाठी चिंतेची बाब मानली जात आहे. बेरोजगारी, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि शैक्षणिक सुधारणांच्या मुद्द्यांवर ही चळवळ पुढे सरकत असल्याने पुण्यातील आंदोलनाकडे राज्यभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. 11 जूनला पुण्यात होणाऱ्या या आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो आणि त्याचे राजकीय पडसाद किती दूरवर उमटतात, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *