![]()
दिल्ली पोलिसांचे डीसीपी सुमीत झा यांच्या राजीनाम्याचा दावा करणारा ‘एआय-जनरेटेड’ बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप यांना चांगलेच भोवले आहे. जनतेची दिशाभूल केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नेमकं काय आहे प्रकरण? भाजपचे सोशल मीडिया सहसंयोजक निखिल भामरे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. महाराष्ट्र सायबरच्या नोडल सायबर पोलीस ठाण्यात भाई जगताप यांच्यावर FIR नोंदवण्यात आला आहे. हा गुन्हा भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 353(2) तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) अधिनियमातील संबंधित कठोर तरतुदींनुसार दाखल करण्यात आला आहे. ‘@Bhaijagtap1’ या अधिकृत ‘एक्स’ (X) हँडलवरून दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा भास निर्माण करणारा एक खोटा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. समाजात संभ्रम निर्माण करणे आणि जाणीवपूर्वक जनतेची दिशाभूल करणे, हा यामागील उद्देश असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. PIB आणि दिल्ली पोलिसांचा महत्त्वाचा खुलासा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओची दखल घेत PIB Fact Check आणि खुद्द दिल्ली पोलिसांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. डीसीपी सुमित झा यांनी राजीनामा दिल्याची बातमी पूर्णपणे निराधार आहे. संबंधित व्हिडिओ हा 100 टक्के ‘एआय-जनरेटेड’ आणि बनावट असल्याचे अधिकृत यंत्रणांनी स्पष्ट केले असून, नागरिकांना अशा खोट्या माहितीपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भाजपची आक्रमक भूमिका या प्रकरणावर भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी तीव्र प्रतिक्रिया देत भाई जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे. “लोकशाहीमध्ये मतभेद नक्कीच असू शकतात, पण फेक AI व्हिडिओच्या आधारे जनतेची फसवणूक कधीही खपवून घेतली जाणार नाही. अधिकृत यंत्रणांनी व्हिडिओ बनावट असल्याचे आधीच स्पष्ट केले असतानाही, काँग्रेस नेत्याने तो शेअर करून जनतेची दिशाभूल केली आहे. हा अत्यंत गंभीर प्रकार असून त्यांनी तात्काळ तो व्हिडिओ हटवून महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी.” पुढील तपास सुरू सध्या या प्रकरणाचा पुढील तपास महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून वेगाने सुरू आहे. या घटनेमुळे ‘एआय’ (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर, सोशल मीडियावरील खोटा प्रचार आणि त्यावरील कायदेशीर कारवाई हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हेही वाचा… संजय राऊतांना मानसिक उपचाराची गरज:वर्गणी काढून सिंगापूरच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवू; भाजपचा पलटवार; पेपरफुटीवरून सुप्रिया सुळेंनाही टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणारे शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी अत्यंत तीक्ष्ण शब्दांत पलटवार केला आहे. “संजय राऊत आणि त्यांचे मालक उद्धव ठाकरे हे दोघेही मेंटल झाले आहेत. त्यांना उपचाराची गरज आहे. त्यांची आर्थिक अडचण असेल तर आम्ही वर्गणी काढून त्यांना सिंगापूरच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवू,” अशी खोचक टीका नवनाथ बन यांनी भाजप प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी संजय राऊत, उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते भाई जगताप आणि सुप्रिया सुळे यांच्यावर विविध मुद्द्यांवरून निशाणा साधला. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
दिल्ली पोलिसांचा बनावट AI व्हिडिओ शेअर करणे भोवले:काँग्रेस नेते भाई जगतापांवर गुन्हा दाखल, भाजपची माफीची मागणी