![]()
दिवाळीत फटाक्यांमुळे आग लागू नये, यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाने तयारी केली आहे. गांधीबाग, सीताबर्डी आणि फटाका बाजार परिसरात अग्निशमन वाहने आणि उपकरणे तैनात ठेवण्यात येणार आहेत. अग्निशमन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ८ आणि १४ नोव्हेंबरच्या राजपत्रित, किरकोळ आणि अर्जित रजा रद्द करण्यात आल्या आहेत. सुरक्षिततेची काळजी घेऊन पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन विभागाने केले आहे. आगीच्या घटनांना तातडीने प्रतिसाद देण्यासाठी शहरातील सर्व अग्निशमन केंद्रांवर पुरेसे कर्मचारी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पाचपावली अग्निशमन केंद्रही या काळात सुरू राहणार आहे. कार्यालयीन कामावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ८ आणि १४ नोव्हेंबरला तीन पाळ्यांमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश आहेत. यात सायंकाळी ४ ते रात्री ११ आणि रात्री ११ ते सकाळी ८ या वेळेतील ड्युटीचा समावेश आहे. आपत्कालीन परिस्थितीत कर्मचारी कमी पडू नयेत, यासाठी कळमना येथील प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींना अग्निशमन केंद्रांवर मदतीसाठी बोलावले आहे. यांत्रिकी विभागाकडून वाहनचालकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अग्निशमन वाहने, उपकरणे आणि साहित्य सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. फटाके फोडताना ही काळजी घ्या: – फटाके मोकळ्या आणि सुरक्षित जागेतच फोडा. – लहान मुलांनी मोठ्यांच्या देखरेखीखाली फटाके फोडावेत. – इमारती, वाहनतळ आणि गर्दीच्या ठिकाणी फटाके फोडणे टाळा. – ज्वलनशील पदार्थांजवळ फटाके पेटवू नका. – फटाका विक्रेत्यांनी अग्निसुरक्षेचे नियम आणि आवश्यक उपाय पाळावेत.
Source link
दिवाळीत आगीच्या घटनांना रोखण्यासाठी अग्निशमन दल सज्ज:नागपुरातील फटाका बाजारांत वाहने तैनात; 8 आणि 14 नोव्हेंबरला कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द