कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य मंत्रिमंडळाने गोकुळवर मतदानाच्या अधिकारासह 4 शासननियुक्त संचालक लादण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाविकास आघाडीने आक्रमक पवित्र
.
दोन दिवसांपूर्वी ‘लोकशाही वाचवा’ची आरोळी, अन् आज लोकशाहीवरच घाला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुटप्पी भूमिकेवर ताशेरे ओढताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “सुरुवातीला ईव्हीएम (EVM) सेट केले जायचे. त्यानंतर मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या नावाखाली सोयीस्कररीत्या मतदारसंघांची चिरफाड केली गेली. जात आणि धर्माच्या नावावर राजकारण तर रोजचेच झाले आहे. कधी निवडून आलेल्या आमदारांना सुरत आणि गुवाहाटीच्या सहली घडवल्या गेल्या, तर कधी निवडणुकीपूर्वीच उमेदवारांचे अर्ज माघारी घ्यायला लावून बिनविरोध निवडणुकांच्या नावाखाली सत्ता व पैशाचा अतिशय नंगानाच सुरू केला गेला.”
निवडून आलेल्यांनाच अल्पमतात आणण्याचा नवा फंडा
“गोकुळच्या बाबतीत मात्र देवेंद्रजींनी आता जरा नवाच फंडा आजमावायचे ठरवले आहे. सत्तेच्या जोरावर थेट निवडून आलेल्या लोकांनाच अल्पमतात आणायचे, हा प्रकार सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच ठाण्यामध्ये ‘लोकशाही वाचवा’ अशी आरोळी ठोकणाऱ्या देवेंद्रजींनी गोकुळच्या निमित्ताने लोकशाहीवर कसा घाला घातला आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर उघड झाले आहे.”
मुश्रीफ साहेब, तुमच्याकडून हा रडीचा डाव अपेक्षित नाही; भान ठेवा!
मंत्री हसन मुश्रीफ यांना उद्देशून बोलताना सुषमा अंधारे यांनी अत्यंत सूचक शब्दांत त्यांना जाब विचारला. “देवेंद्र फडणवीस असतील किंवा धनंजय महाडिक असतील, या लोकांकडून आम्हाला फारशी अपेक्षा नाही. परंतु हसन मुश्रीफ साहेब, आपल्याकडून मात्र नक्कीच अपेक्षा आहे. राज्याच्या राजकारणात तुमचा चेहरा हा नेहमीच अत्यंत रॅशनल (तर्कशुद्ध) राहिला आहे आणि आपल्याबद्दल आम्हाला कायम एक आदर व आश्वस्तता वाटत आली आहे.”
खलनायकांच्या यादीत जाऊ नका
“मुश्रीफ साहेब, तुमच्याकडून तरी हा असा रडीचा डाव अजिबात अपेक्षित नाही. आमदार सतेज पाटील यांनी जिद्दीने निवडणूक लढवली आहे आणि ती जिंकली देखील आहे. अशा वेळी जिंकलेल्या माणसाचा जनादेश नाकारून, 4 स्वीकृत सदस्य नेमून त्यांना एका नव्या पेचात टाकण्याचा जर प्रयत्न होत असेल, तर दुर्दैवाने आपणही त्या खलनायकांच्या यादीत जात आहात. कृपया याचे भान असावे, एवढीच आमची विनंती आहे,” असे अंधारे यांनी स्पष्ट केले.
गोकुळच्या सत्तासंघर्षात महाविकास आघाडी एकवटली
गोकुळ दूध संघाच्या 25 जागांपैकी 13 जागा सतेज पाटील यांच्या आघाडीने जिंकल्या असतानाही, 14 च्या कोरमचा तांत्रिक अडसर निर्माण करून महायुतीने 4 शासननियुक्त संचालक मतदानाच्या अधिकारासह नेमण्याचा अध्यादेश आणला आहे. या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, अनिल देशमुख आणि स्वतः शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर, आता सुषमा अंधारे यांनीही मुश्रीफांना थेट आरसा दाखवल्यामुळे कोल्हापूरचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.
—————————————————-
हेही वाचा…
अजित दादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी आज एकत्र दिसल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले- 12 फेब्रुवारीची तारीख निश्चित झाली होती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत सध्या कोणतीही अधिकृत चर्चा नसली तरी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यासंदर्भात एक अत्यंत मोठा आणि खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. “जर आज अजितदादा असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र दिसल्या असत्या. त्यांच्या अपघाती निधनामुळे विलिनीकरणाचा हा विषय मागे पडला,” असा खुलासा सुनील तटकरे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी