![]()
जो सत्तेत तोच शक्तिमान याचा प्रत्यय राज्यातील २९ मतदारसंघांतील शेतकऱ्यांना आला आहे. ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’त सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघांवर ३ कोटींपासून थेट १८.८२ कोटींपर्यंतच्या निधीची उधळण करण्यात आली. तर विरोधी पक्षातील आमदारांच्या पदरात मात्र प्रत्येकी २.५० कोटींचा दिला आहे. या राजकीय कुरघोडीत शिक्षा मात्र शेतकऱ्यांना मिळाली आहे. विरोधी आमदार असलेल्या भागात निधीअभावी कमी कामे होणार असल्याने तेथील शेतकऱ्यांना यंदाही चिखलातूनच वाट शोधावी लागणार आहे. ‘दिव्य मराठी’ने १५६ मतदार संघांच्या निधीचे विश्लेषण केल्यानंतर हा पक्षपातीपणा समोर आला आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी बारमाही चांगला रस्ता मिळावा आणि शेतमाल विनासायास घरी आणता यावा, यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना’ सुरू केली आहे. महसूल विभागाने २३ जून रोजी या योजनेच्या निधी मर्यादेची नवीन सुधारित यादी जाहीर केली आहे. या यादीत सध्यातरी राज्यातील १५६ मतदारसंघांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यापैकी २९ (१८ टक्के) आमदारांना प्रत्येकी अवघा अडीच कोटींचा निधी मिळाला आहे. यात विरोधी पक्षांचे (ठाकरेसेना, शरद पवार गट, काँग्रेस) आमदार आहेत. दुसरीकडे, सत्ताधारी बाकांवरील १२७ आमदारांच्या (८२ टक्के) मतदारसंघात ३ कोटी, ५ कोटी, ७.५० कोटी आणि बारामती मतदारसंघासाठी १८.८२ कोटींचा भरघोस निधी वर्ग करण्यात आला आहे. याबाबत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधला असता, ते पावसाळी अधिवेशनात असल्याने त्यांची या निधीबाबत भूमिका समजू शकली नाही. विरोधकांच्या मतदारसंघात समिती नावापुरतीच बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना राबवण्यासाठी प्रत्येक मतदारसंघनिहाय समिती तयार करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष हे स्थानिक आमदार असणार आहेत, तर उपविभागीय अधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. याशिवाय तहसीलदार, बीडीओ, तालुका कृषी अधिकारी, उपअभियंता व ५ शेतकरी हे अशासकीय सदस्य म्हणून समितीत असतील. मात्र, आमदाराच्या हातात पुरेशा निधीची ताकदच दिली नसल्याने ही समिती विरोधी आमदारांच्या मतदारसंघात नावापुरतीच उरणार आहे. पाणंद रस्ते योजनेत दुजाभाव एकूण आमदार : १५६ । एकूण निधी ९०१.३२ कोटी रुपये
ठाकरेसेना : मेहकर बाळापूर दर्यापूर वणी परभणी खेड-आळंदी उमरगा धाराशिव बार्शी गुहागर । काँग्रेस : नवापूर रिसोड उमरेड साकोली आरमोरी बह्मपुरी यवतमाळ । रा.काँ.श.प. : कर्जत बीड करमाळा माढा मोहोळ माळशिरस ईश्वरपूर पलूस कडेगाव तासगाव । शेकाप : सांगोला । सीपीआय : डहाणू
Source link
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:सत्ताधारी आमदारांना 830 तर, विरोधकांना फक्त 70 कोटी, आमदार विरोधी पक्षांचे, शिक्षा मात्र शेतकऱ्यांना