![]()
जालन्यात ‘सॉइल टू सिल्क’ आणि ‘सिल्क टू फॅब्रिक’ ही संकल्पना राबवली जात आहे. या माध्यमातून तुती लागवड ते रेशीम वस्त्र तयार करण्याची एक मूल्यवर्धित साखळी विकसित करण्यात आली आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. जिल्ह्यातील स्थानिकांना रेशीम उद्योगात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी देशात प्रथमच स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभाग आणि केंद्रीय रेशीम मंडळाच्या मदतीने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून ७ प्रकारच्या कोर्समधून ४६० जणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी कौशल्य विकास विभागाने २ कोटी २४ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून पुढील ४५ दिवसांत प्रशिक्षण सुरू होणार आहे. १४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रेशीम बाजारपेठ संकुलाचे लोकार्पण करण्यात आले. याच कार्यक्रमात पैठणीच्या धर्तीवर जालन्याची ‘जालनाई’ या रेशीम वस्त्राच्या ब्रँडचे अनावरण करण्यात आले. तुती लागवड, कोषनिर्मिती, धागा आणि रेशमी वस्त्र निर्मिती ही साखळी आता जालन्यात सुरू झाली आहे. सेलिब्रिटी करणार ब्रँड मार्केटिंग ‘जालनाई’ ब्रँडअंतर्गत फक्त साड्याच नाही, तर शॉल आणि जॅकेटही तयार केले जाणार आहेत. या ब्रँडचे वेगवेगळ्या क्षेत्रांतील सेलिब्रिटींच्या माध्यमातून मार्केटिंग करण्याचे नियोजन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. अशी होणार प्रशिक्षणार्थींची निवड महिला बचत गट, प्रत्यक्ष रेशीम शेती करणाऱ्या महिला, जालन्यातील विडी कामगार महिला अन् होतकरू महिलांची निवड केली जाणार आहे. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असेल. यात काही पुरुषांनाही प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी येत्या आठवडाभरात कौशल्य विकास विभागाच्या वतीने उमेदवारांची निवड केली जाणार आहे. निर्यातीसाठीही प्रयत्न केले जातील आम्ही जालन्यात तुती लागवड ते रेशीम वस्त्रनिर्मिती अशी एक साखळी विकसित केली आहे. ड्रायपोर्ट सुरू झाला आहे. त्यामुळे येथून रेशीम वस्त्र निर्यात करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. – आशिमा मित्तल, जिल्हाधिकारी हे असतील सात कोर्स सिल्क रीलिंग (५०) सिल्क ट्विस्टिंग (३०) सिल्क डाइंग (३०) वॉर्पिंग अँड वेफ्टिंग (३०) सिल्क वीव्हिंग (२००) स्किल अपग्रेडिंग (६०) प्रॉडक्ट डेव्हलपिंग (६०). (कंसात प्रशिक्षणार्थी संख्या)
Source link
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:रेशीम कपड्यांसाठी जालन्यात पहिलाच स्वतंत्र अभ्यासक्रम, मंत्री मुंडे, जिल्हाधिकारी मित्तल यांचा पुढाकार