![]()
महापालिका गोदामातील अतिक्रमणविरोधी पथकाचे भंगार साहित्य चोरीचे प्रकरण चर्चेत असतानाच मंडई विभागातील कर्मचाऱ्यांनीही असेच कारनामे केल्याचे उघडकीसआले. मुरारजी पेठेतील महात्मा फुले मार्केटमधील (सुपर बझार) दोन बंद गाळेधारकांनी भाडे न भरल्याने त्यांचे साहित्य 15 मे रोजी जप्त करण्यात आले. ते नियमानुसार रेकॉर्डला नोंद करुन मनपाच्या गोदामात ठेवणे अपेक्षित होते. मात्र मंडई विभाग कर्मचाऱ्यांनी ते पोटफाडी चौकातील मनपाच्या कोंडवाड्यात लपवून ठेवले. त्याबाबत न अधिकाऱ्यांना कळवले ना रेकॉर्डला नोंद केली. मात्र अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या कारवाईतील भंगार चोरी 18 मे रोजी उघडकीस आल्यानंतर मात्र सावध होऊन या कर्मचाऱ्यांनी 21 मे रोजी जप्त साहित्याचीआवक-जावक रजिस्टरला नोंद घेतली. ‘दिव्य मराठी’ने शुक्रवारी प्रत्यक्ष घटनास्थळीच हा प्रकार उघडकीसआणला. महात्मा फुले मार्केट येथील गाळा क्रमांक दोन हा गजानन नाना बामणे यांच्या नावे भाडेतत्वावर होता. त्यांच्याकडे 48 हजार रुपयांची थकबाकी होती. गाळा क्रमांक 5 हा संतोष हरी जाधव यांच्या नावाने असून, त्यांच्याकडे 1 लाख 2 हजार 604 रुपयांची थकबाकी आहे. त्याच्या वसुलीसाठी गाळे सील करुन महाापलिकेने फेब्रुवारी 2026 मध्ये या गाळ्यांचा लिलाव केला. गाळा दुसऱ्या व्यक्तीला भाडेतत्त्वावर देण्यात आला. 15 मे रोजी गाळ्यांचे कुलूप तोडून त्यातून आधीच्या मालकांचे साहित्य कर्मचाऱ्यांनी जप्त केले. हे साहित्य नियमानुसार गोदामात जमा करणे अपेक्षित होते. परंतु नियंत्रण अधिकाऱ्यांना न विचारताच कर्मचाऱ्यांनी परस्पर कोंडवाड्यात नेऊन लपवले. खरे पाहता 15 मे रोजीच या जप्त साहित्याची आवक रजिस्टरला नोंद व्हायला हवी होती. पण ती नोंद 21 मे रोजी करण्यात आला. हा संशयास्पद प्रकार ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणला. याबाबत सोलापूर महानगर पालिकेतील मंडई विभागाचे अधीक्षक मल्लिनाथ तोडकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनीही दोषी कर्मचाऱ्यांची पाठराखण करण्याची भूमिका घेतली. हा प्रकार समजल्यानंतर नगरसेवक अक्षय अंजिखाने यांनी महापालिका नियंत्रण अधिकारी तपन डंके यांना फोनवरून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी तोडकर आणि निरीक्षक कट्टीमनी या दोघांना ‘कारणे दाखवा’ नोटीस देतो असे सांगितले. मल्लिनाथ तोडकर, मंडई विभाग अधीक्षक, महापालिका सोलापूर Q तुमच्या विभागातील कर्मचाऱ्यांनी जप्त केलेल्या गाळ्यातील साहित्याचा पंचनामा झाला का?
A 15 मे रोजी कर्मचाऱ्यांनी साहित्य ताब्यात घेतले आणि त्याच वेळी पंचनामा केला.
Q जर तेव्हाच पंचनामा केला तर आवक रजिस्टरला त्याची नोंद का नाही घेतली?
A (सावध होत) 21 मे रोजी केलेली आहे.
Q पंचनामा 15 ला अन् नोंद 21 असे का?
A आमच्या विभागातील क्लार्क नवीन आहे. झाली असेल त्यांच्याकडून एखादी चूक.
Q जप्त केलेल्या साहित्य मनपाच्या गोदामात ठेवण्याऐवजी कोंडवाड्यात का ठेवले ?
A गोदामातून हे साहित्य चोरीला जाईल या भीतीने कोंडवाड्यात आणून ठेवले.
Q जप्तीचे साहित्य दुसरीकडे ठेवण्यासाठी नियंत्रण अधिकाऱ्यांची संमती घेतली होती ?
A नियंत्रण अधिकारी तपन डंके हे रजेवर होते. म्हणून त्यांना नाही विचारले. कोंडवाड्यात सीसीटीव्ही बंद, शिपायाने टोकले तर त्यालाच दरडवले या कोंडवाड्यात महापालिकेचा एक शिपाई असतो. ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने या ठिकाणी जाऊन तिथे दडवून ठेवलेले साहित्य पाहिले. या ठिकाणी ॲल्युमिनिअमचे दारे, विद्युत तारांचे बंडल, संगणक, हार्ड डिस्क, लोखंडी साहित्य दिसून आले. सुमारे एक लाखाचा ऐवज असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कोंडवाड्याच्या आवारात दारूच्या बाटल्या पडलेल्या होत्या. सीसीटीव्ही होते, पण एक कॅमेरा चेारीस गेला तर दोन कॅमेरे बंद होते. ‘हे साहित्य इथे का ठेवले?’ या प्रश्नावर शिपाई म्हणाला, ‘मी कट्टीमनींना म्हणालो इथे का सामान ठेवता. तर मलाच खडसावले. तू शिपाई आहे, तुला काय करायचे? शहाणपणा शिकवू नको,’ असे म्हणाले. मी काय करणार साहेब, शिपाई माणूस, शांत बसलो…’
Source link
दिव्य मराठी एक्स्पोज:सोलापूर मनपात भंगार चोरीनंतर मंडई कर्मचाऱ्यांची हातसफाई उघड, बंद 2 गाळ्यातून 15 मे रोजी जप्त केलेले 1 लाखाचे साहित्य कोंडवाड्यात लपवले