Headlines

दुबईला जाणाऱ्या कंटेनरमधून 400 लिटर पेट्रोलियम जेली चोरी:6 आरोपी अटकेत, 16 लाखांचा मुद्देमाल जप्त




तळोजा येथील रिफायनरीतून जेएनपीटीमार्गे दुबईला निर्यात होणाऱ्या पेट्रोलियम जेलीची चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कंटेनरमधून पाइपच्या साहाय्याने पेट्रोलियम जेली काढून ती पिकअप व्हॅनमधील बॅरलमध्ये भरली जात असताना एपीएमसी पोलिसांनी छापा टाकून 6 जणांना अटक केली. या कारवाईत सुमारे 400 लिटर पेट्रोलियम जेली जप्त करण्यात आली असून, तिची किंमत अंदाजे 1 लाख रुपये आहे. पोलिसांनी कंटेनर, पिकअप व्हॅन आणि ट्रेलरसह एकूण 16 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कंटेनरमधून पाइप लावून जेली काढत असताना छापा एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे 9 वाजता पुनीत कॉर्नर परिसरातील पार्किंगमध्ये एका कंटेनरमधून पेट्रोलियम पदार्थ काढले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील आणि त्यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी धाव घेत छापा टाकला. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा कंटेनरमधील पेट्रोलियम जेली पाइपच्या माध्यमातून बाहेर काढली जात होती. ही जेली बाजूला उभ्या असलेल्या महिंद्रा पिकअप व्हॅनमध्ये ठेवलेल्या बॅरलमध्ये भरली जात असल्याचे आढळले. पोलिसांनी घटनास्थळी कारवाई करत चोरीचा प्रकार उघडकीस आणला आणि संबंधितांना ताब्यात घेतले. निर्यातीच्या मालावर डल्ला; लाखोंचा मुद्देमाल जप्त तळोजा रिफायनरीतून जेएनपीटीकडे नेण्यात येणारा हा कंटेनर दुबईला पेट्रोलियम जेली पाठवण्यासाठी वापरला जात होता. निर्यातीसाठी वाहतूक सुरू असताना मधल्या टप्प्यात कंटेनरमधील माल चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपींनी नियोजनपूर्वक पाइपच्या मदतीने जेली काढून दुसऱ्या वाहनात साठवली होती. या कारवाईत चोरीची पेट्रोलियम जेली, कंटेनर, महिंद्रा पिकअप व्हॅन आणि ट्रेलर असा एकूण 16 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली असून, चोरीचा माल कुठे विकला जाणार होता किंवा या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. निर्यातीच्या मालाची वाहतूक करताना चोरीचा प्रकार समोर आल्याने या प्रकरणाचा पुढील तपास एपीएमसी पोलिसांकडून सुरू आहे. हेही वाचा…. राहुल गांधींचा पीए असल्याचे सांगून अतुल लोंढेंना गंडवण्याचा प्रयत्न:हॉटेलमध्ये 2 रूम बुक करण्यास सांगितले, पोलिसांत तक्रार काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्वीय सहायक (पीए) असल्याची बनावट ओळख सांगून काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे पाटील यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार नागपुरात समोर आला आहे. एका अनोळखी व्यक्तीने फोन करून राहुल गांधी नागपूर दौऱ्यावर येणार असल्याचे सांगत वर्धा रोडवरील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये 2 खोल्या बुक करण्यास सांगितले. मात्र, फोन करणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर आणि व्हॉट्सॲप प्रोफाइलवर संशय आल्याने अतुल लोंढे यांनी सतर्कता दाखवली. बनावट ओळखीच्या माध्यमातून हॉटेल बुकिंगच्या बहाण्याने फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय असून, या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *