![]()
पुण्यातील फुरसुंगी परिसरात मंगळवारी रात्री पूर्ववैमनस्यातून १७ वर्षीय करण नागटिळकचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी चार अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. करण रवींद्र नागटिळक भोसले व्हिलेज, श्री दत्त मंदिराजवळ, भेकराईनगर येथे राहत होता. त्याची बहीण सोनाली (२२) हिने फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. करणचे आई-वडील मजुरी करतात. नागटिळक कुटुंब मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करणचा आरोपींशी काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. १७ नोव्हेंबरला रात्री आठच्या सुमारास तो भोसले व्हिलेज परिसरातील रेल्वेमार्गाजवळून जात होता. हडपसर ते सासवड स्थानकादरम्यान रेल्वेमार्गालगत आरोपींनी त्याला गाठून शस्त्राने वार केले. करण गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, अशी माहिती फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अमोल मोरे यांनी दिली. मोरे या प्रकरणाचा तपास करत आहेत. ज्वेलर्स दुकानातून हिऱ्याची अंगठी चोरी लक्ष्मी रस्त्यावरील सराफी पेढीतून खरेदीच्या बहाण्याने हिऱ्याची सोन्याची अंगठी चोरल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अंगठीची किंमत ४० हजार रुपये आहे. सराफी पेढीच्या मालकाने याबाबत तक्रार दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, महिला १३ नोव्हेंबरला उंबऱ्या गणपती चौकातील पेढीत आली. दागिने खरेदी करायचे असल्याचे सांगून तिने कर्मचाऱ्यांना अंगठी दाखवण्यास सांगितले. कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून तिने त्यांच्या नकळत अंगठी चोरली. चोरी लक्षात आल्यानंतर पेढीच्या मालकाने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी पेढीतील सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेतले असून, महिलेचा शोध सुरू आहे. पोलीस कर्मचारी शेडजाळे तपास करत आहेत.
Source link
पूर्ववैमनस्यातून अल्पवयीनाचा खून:फुरसुंगीत रेल्वेमार्गाजवळ चौघांनी तीक्ष्ण शस्त्राने वार केले; चौघे ताब्यात