![]()
जालना जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी शाळा गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नगरपरिषद क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयांची उभारणी आणि शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यावर भर दिला जाणार आहे. या उपक्रमांसाठी 15 कोटी 66 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विकासकामे वेळेत पूर्ण करावीत, निधी अखर्चित राहू नये आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. जालना जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांचा पंकजा मुंडे यांनी आढावा घेतला. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवारिया तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात मंजूर असलेल्या योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालये, शाळा गुणवत्ता विकासावर भर नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नगरपरिषद क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालये उभारण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना वाचनाची सुविधा उपलब्ध करून देणे, शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध करणे आणि शाळांमधील गुणवत्तावाढीसाठी आवश्यक उपक्रम राबविणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. शाळा गुणवत्ता विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी 4 कोटी 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. या माध्यमातून गरजू दिव्यांग व्यक्तींना ई-रिक्षा तसेच विविध सहाय्यभूत उपकरणे देण्यात येणार आहेत. दिव्यांगांना स्वावलंबी बनविणे आणि त्यांच्या रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी या योजनांचा लाभ दिला जाणार आहे. वीज वितरण व्यवस्था बळकट करण्यासाठी विविध कामे जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी उपकेंद्रांची उभारणी, ट्रान्सफॉर्मर बसविणे, रोहित्रांची क्षमता वाढविणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. विशेषतः दुष्काळी परिस्थितीत शेती आणि नागरिकांना वीजपुरवठ्याबाबत दिलासा मिळावा, यासाठी वीज यंत्रणेचे बळकटीकरण महत्त्वाचे असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. सौर हायमास्ट दिवे उभारण्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जलसंधारणाच्या निधी खर्चासाठी तातडीने कार्यवाही जिल्हा जलसंधारण विभागाला उपलब्ध झालेला निधी अपेक्षित प्रमाणात खर्च होत नसल्याबाबत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. विकासकामांसाठी मंजूर निधी खर्च न होता परत जाणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता वेळेत मिळावी आणि कामे प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील विविध विभागांना मंजूर निधीचा योग्य वापर करून विकासकामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी. योजनांच्या अंमलबजावणीमध्ये कोणतेही अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी आवश्यक समन्वय साधण्याचेही त्यांनी सांगितले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी रेशीम उद्योगातून साडीनिर्मिती महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी रेशीम उद्योगाच्या माध्यमातून साडीनिर्मिती व्यवसाय उभारण्यास मदत करण्याचे निर्देश पंकजा मुंडे यांनी दिले. या उपक्रमातून महिलांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. संबंधित विभागांनी या व्यवसायासाठी आवश्यक प्रशिक्षण, सुविधा आणि नियोजनाच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळी परिस्थिती असली तरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि शाळांच्या दुरुस्तीची कामे थांबू नयेत. नागरिकांना आरोग्य सुविधा आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बैठकीत सांगितले.
Source link
जालना जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी शाळा गुणवत्ता विकास कार्यक्रम राबवणार:ग्रंथालय उभारणीसह शैक्षणिक सुविधांसाठी 15 कोटी 66 लाखांची तरतूद, पालकमंत्री पंकजा मुंडेंनी घेतला विकासकामांचा आढावा