Headlines

दुरवस्था:लाखो रुपयांची शौचालये कुलूपबंद; शेवगावात ‘स्वच्छ भारत’चा बोजवारा!




स्वच्छ भारत अभियानाचा गाजावाजा करत नागरिकांच्या आरोग्याच्या नावाखाली सार्वजनिक निधीतून लाखो रुपये खर्च केले जात असताना प्रत्यक्षात सार्वजनिक शौचालये कुलूपबंद आणि धूळ खात असल्याचा आरोप शेवगाव नगरपरिषद हद्दीत करण्यात आला आहे. नाईकवाडी आणि नीलकंठनगर परिसरातील शौचालयांची दुरवस्था जीपीएस फोटो पुराव्यांसह समोर आणत माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत बप्पासाहेब घुमरे यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीसोबत जोडलेल्या छायाचित्रांनुसार संबंधित शौचालयांच्या इमारती जीर्ण व अस्वच्छ अवस्थेत आहेत. परिसरात कचरा, मातीचे ढीग आणि जुने बांधकाम साहित्य पडून आहे. नळ, दरवाजे, पाण्याच्या टाक्या आणि ड्रेनेज व्यवस्था मोडकळीस आल्याने शौचालयांचा वापर करणे नागरिकांसाठी गैरसोयीचे ठरत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. लाखो रुपये खर्चून उभारलेल्या सुविधा वापराविना पडून असल्याने नागरिकांना उघड्यावर जाण्याची वेळ येत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. घुमरे यांनी नगरपरिषद हद्दीतील सर्व सार्वजनिक शौचालयांची तातडीने स्वतंत्र स्थळपाहणी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल तयार करण्याची मागणी केली आहे. बंद शौचालये स्वच्छ करून वीज, पाणी व आवश्यक सुविधा उपलब्ध करून ती नागरिकांसाठी खुली करावीत, तसेच दुरवस्थेला जबाबदार अधिकारी, कर्मचारी व संबंधित कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी अशी मागणी आहे. ^शौचालय दुरुस्तीचे टेंडर झालेले आहे. परंतु ठेकेदाराची मुदत संपलेली असल्याने मुदतवाढीचा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला होता. परंतु सर्वसाधारण सभेने बहुमताने सदरील ठराव नामंजूर करून झालेल्या कामाची चौकशी करावयास सांगितले होते. त्यानुसार चौकशी चालू आहे. पुढील कारवाई करण्यात येईल. – विजया घाडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, न.प. शेवगाव. कागदपत्रे येण्याची वाट न पाहता दोषींवर कारवाई करावी जनतेच्या करातून उभारलेल्या सुविधा वापराविना कुलूपबंद ठेवणे गंभीर बाब आहे. या कामांचे मंजूर अंदाजपत्रक, इस्टिमेट, निविदा प्रक्रिया, मोजमाप पुस्तिका (एमबी रेकॉर्ड) आणि गुणवत्ता तपासणीचे दस्तऐवज माहिती अधिकार कायद्यान्वये मागविण्यात येत आहेत. प्रशासनाने कागदपत्रे समोर येण्याची वाट न पाहता दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी प्रशांत घुमरे यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *